पाण्यासाठी महिनाभर वाट पहावी लागत असेल तर असला लोकप्रतिनिधी काय कामाचा? – धनंजय मुंडे

23 Feb 2018 , 08:08:08 PM

पाण्यासाठी माझ्या भगिनींना पायपीट करावी लागते. तब्बल २९ दिवसानंतर इथल्या जनतेला पाणी मिळते. पाण्यासाठी महिनाभर वाट पहावी लागत असेल तर असला लोकप्रतिनिधी काय कामाचा? असा सवाल विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला. काल जगभर छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी केली गेली. मात्र संघ आणि भाजपच्या लोकांनी कुठेही शिवजयंती साजरी केल्याचे दिसले नाही. यांच्या मनात आमच्या राजाबाबत द्वेष असल्याचे स्पष्ट झाल्याचे ते म्हणाले. आज हल्लाबोल आंदोलनातील सतरावी सभा बोदवड येथे झाली.

सत्ता आल्यावर मी स्वतः पाणीटंचाई असलेल्या जळगावात योग्य व्यवस्था करून देईन - खा. सुप्रिया सुळे

पाण्याची टंचाई असलेल्या जळगाव भागातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या उमेदवारांना निवडून द्या, मी स्वतः तुम्हाला पाण्याची व्यवस्था करून देईन असे आश्वासन खा. सुप्रिया सुळे यांनी केले. त्यावेळी सत्तांतर झाल्यावर पाण्यासाठी महिलांना वणवण फिरावे लागणार नाही असा विश्वास सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केला. आघाडी सरकारच्या काळात या भागात पाण्यासाठी विशेष योजना करण्यात आली होती, त्यासाठी निधीही दिला होता. मात्र या सरकारने इथे पाणी मिळावे यासाठी काहीच प्रयत्न केले नाहीत अशी टीका त्यांनी केली. दारूला महिलेचे नाव द्या असे वक्तव्य करणाऱ्या गिरीश महाजनांबद्दल एक शब्दही बोलण्याची इच्छा नसल्याचे त्या म्हणाल्या. माझ्या मंत्रिमंडळात जर असा व्यक्ती असता तर कधीच त्याला घरचा रस्ता दाखवला असता असा टोला त्यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला.

शालेय पोषण आहारामध्ये केळी फळाचा समावेश करणार, जामनेरला प्लास्टिक पार्क, टेक्स्टाईल पार्क बनवणार, भुसावळ येथे टेक्सटाईल पार्क करु असेही आश्वासन या सरकारकडून देण्यात आले होते. समोर माणसं दिसली की पुड्या सोडण्याचे काम भाजपचे नेते करत असल्याचे आरोप विधिमंडळ गटनेते जयंत पाटील यांनी केला. भाजप जळगावमध्ये एक लाख रोजगार निर्माण करणार होते. जळगावकरांनी त्याबद्दल सरकारला जाब विचारा असे आवाहन त्यांनी केले. हरिप्रसाद नावाच्या आरटीआय कार्यकर्त्याने २०१६ साली पीएनबीचा घोटाळा बाहेर काढून पंतप्रधान कार्यालयाला पत्र पाठवून याबाबत कळवले होते. तरिही मागच्या महिन्यात पंतप्रधान नीरव मोदी यांना घेऊन दावोसच्या आंतराष्ट्रीय आर्थिक परिषदेला गेले. यांच्यात काही साटंलोटं आहे का? असा सवाल त्यांनी केला.

राम मंदिराचा भावनिक मुद्दा पुढे करुन भाजपने लोकांची फसवणूक केली. रामाचे मंदिर व्हावे म्हणून जनतेने यांना निवडून दिले होते. मात्र यांनी तर रामालाही फसवले. ज्यांनी देवालाही फसवले ते आपल्याला सोडणार आहेत का? असा सवाल आमदार भास्कर जाधव यांनी केला.

संबंधित लेख