कर्नाटकात राष्ट्रवादी उमेदवार देणार नाही, काँग्रेसला पाठिंबा देणार - डी. पी. त्रिपाठी

16 Apr 2018 , 10:38:28 PM

कर्नाटकात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष उमेदवार देणार नाही. आमचा पक्ष हा नेहमी समविचारी पक्षांसोबत निवडणूक लढतो. त्यानुसार या निवडणुकीमध्ये आम्ही काँग्रेसला पाठिंबा देत आहोत, अशी घोषणा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस माजी खासदार डी. पी. त्रिपाठी यांनी केली. मुंबईतील पक्षाच्या प्रदेश कार्यालयात पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या निवडणुकीत राष्ट्रवादीसमवेत काँग्रेस नक्की यश मिळवेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

यावेळी उत्तर प्रदेशमध्ये झालेल्या सामूहिक बलात्काराच्या घटनेबाबत बोलताना ते म्हणाले की ही घटना लज्जास्पद आणि निंदनीय आहे. या घटनेत भाजपचे आमदार कुलदीप सिंह सेंगर हे आरोपी आहेत. या प्रकरणी त्यांच्याविरोधात तक्रारदेखील दाखल करण्यात आली आहे. मात्र, तेथील पोलिस प्रशासन त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहे. या गोष्टीचा त्यांनी निषेध केला.

या वेळी मुख्य प्रवक्ते नवाब मलिक, प्रदेश प्रवक्ते संजय तटकरे, प्रवक्ते क्लाईड क्रॅस्टो हे उपस्थित होते.