१० जूनला पवार साहेबांच्या उपस्थितीत समारोपाची सभा - सुनील तटकरे

16 Apr 2018 , 10:47:07 PM

विदर्भात कापसाच्या पिकांवर बोंडअळीचे संकट आहे. सरकारने नुकसानभरपाई करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र अद्यापही ती मदत मिळाली नाही. कर्जमाफीबाबतीतही तेच घडले. सरकारने कर्जमाफी दिली, पण त्याबाबत कोणालाही फायदा झाला नाही. त्यामुळे हे हल्लाबोल आंदोलन केले जात आहे. पश्चिम महाराष्ट्रातील हल्लाबोल आंदोलन आज अंतिम टप्प्यात आले आहे. पक्षाच्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून या टप्प्याच्या समारोपाची सभा पवार साहेबांच्या उपस्थितीत पुण्यात १० जून रोजी होईल, अशी माहिती प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिले. आज हडपसर येथे पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

 

आम्ही महाराष्ट्राभर फिरत आहोत. लोकांचा असंतोष आम्हाला जाणवतो आहे. भाजपने राष्ट्रवादीच्या आंदोलनाचा धसका घेतला आहे. त्यामुळे यांच्या महामेळाव्याच्या भाषणात फक्त राष्ट्रवादी काँग्रेसच होता. भाजपने राजकारणाचा जो खालचा दर्जा गाठला आहे, तो महाराष्ट्रात कधी बघायला मिळाला नव्हता, अशी टीका त्यांनी केली.

 

हल्लाबोलचा पाचवा टप्पा कोकणात होणार आहे. त्यात पालघर, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि कोकण प्रांतातील इतर जिल्ह्यांचा समावेश असणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

 

एका ठिकाणी उपोषणादरम्यान भाजपचे सदस्य सँडविच खाताना दिसले. असे उपोषण म्हणजे नौटंकी आहे. त्याने काहीच साध्य होणार नाही, असे विधिमंडळ पक्षनेते अजित पवार म्हणाले. उपोषण करून हे सरकार भावनिक वातावरण तयार करत आहे. सत्ताधारी पक्षच उपोषण करत असेल, तर लोकांनी कोणावर विश्वास ठेवायचा? असेही ते म्हणाले. सत्ताधाऱ्यांनी काँग्रेसला विरोधी पक्षनेतेपद दिले नाही आहे. हा सत्ताधाऱ्यांचा रडीचा डाव आहे, असा आरोपही त्यांनी केला.

 

यावेळी खा. वंदना चव्हाण, प्रवक्ते अंकुश काकडे उपस्थित होते.

संबंधित लेख