फक्त श्रीमंतांच्या मुलांनीच शिक्षण घ्यावे, असे सरकारला वाटते का? - अजित पवार

16 Apr 2018 , 10:49:42 PM

'आरटीई'ची योजना मागील सरकारने काढली. त्या योजनेसाठी या सरकारने ५६३ कोटी रूपये दिले नाहीत. असे का? फक्त श्रीमंतांच्या मुलांनीच शिक्षण घ्यावे, असे सरकारला वाटते का?, असा सवाल विधिमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी सरकारला केला. आज #हल्लाबोल आंदोलनात #चिंचवड येथील सभेत ते बोलत होते.


ते पुढे म्हणाले की पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपचे बहुमत आहे. मात्र आम्ही दोघे भाऊ मिळून खाऊ अशी परिस्थिती आहे. कोणी प्रश्न विचारायला नाही म्हणून हे घडत आहे. कचऱ्याचा प्रश्न येथे गंभीर आहे. सत्ताधारी याबाबत काही बोलत नाहीत. पिंपरी चिंचवडमध्ये रिंगरोड बाधितांचे हाल चालले आहेत. ज्या भागातून रिंगरोड जात आहे, तेथील लोक उद्ध्वस्त होत आहेत.

 

हल्लाबोलचे बॅनर येथे लागले, तर ते काढण्याचा प्रयत्न झाला. ते बॅनर अनधिकृत नसूनही तसा प्रयत्न झाला. हे सरकार स्वतःची बॅनरबाजी सोयीस्कररीत्या विसरत आहे, असा आरोप त्यांनी केला. पाण्याच्या प्रश्नासाठी मी पिंपरी-चिंचवडच्या आयुक्तांसोबत बैठक घेतली. माझा जीव आहे तोपर्यंत पिंपरी-चिंचवडच्या विकासाचा प्रयत्न करेन, असा शब्द त्यांनी दिला.

 

खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या की तुम्ही जर गुगलवर फेकू शब्द टाइप करून सर्च केले, तर त्या ठिकाणी नरेंद्र मोदी यांचे नाव येते. स्मार्ट सिटी हे फेकूचे दुसरे उदाहरण आहे. पक्ष सोडून गेलेल्यांना आता पक्षात थारा नाही. पवार साहेबांना सोडून गेलेले आज कुठे आहेत हे तुम्हीच बघा, असेही त्या म्हणाल्या.

 

ज्यावेळी हल्लाबोल आंदोलनाची सुरूवात विदर्भ येथून झाली, त्यावेळी खऱ्या अर्थाने सरकारविरोधातील संघर्षाला सुरुवात झाली. ज्या पद्धतीने लोक या आंदोलनाला पाठिंबा देत आहेत, त्या वरून स्पष्ट होते की ही परिवर्तनाची नांदी आहे, असे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे म्हणाले.

 

विधानसभा निवडणुकांच्या काळात काहींनी येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीशी दगा केला. त्यांची अवस्था बघून हेराफेरी हा चित्रपट आठवला. त्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवावी, पिंपरी चिंचवडचे लोक तुम्हाला घरी बसवल्याशिवाय राहणार नाहीत, असेही ते म्हणाले. आता येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत मोदी नीरव मोदींच्या नावे मते मागतील. मोदी, फडणवीस यांच्या भाषणावर विश्वास ठेवू नका, असे आवाहन त्यांनी केले.

संबंधित लेख