एकीने उमेदवार दिल्यास मराठी जागा निवडून येतील – शरद पवार

17 Apr 2018 , 12:35:25 AM

कर्नाटकातील आगामी निवडणुकांकडे देशाचे लक्ष आहे. अशा वेळी समितीतील नेत्यांनी एकीने उमेदवार दिल्यास मराठी जागा निवडून येतील. त्यामुळे बेळगाव प्रश्नी सर्वोच्च न्यायालयात बाजू भक्कम झाल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केला. आज बेळगाव येथे मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी पवार साहेबांसह सीमा लढ्यातील ज्येष्ठ नेते कॉ. कृष्णा मेणसे, कॉ. वकील राम आपटे व वकील किसनराव येळ्ळूरकर यांचा समिती व महापालिकेच्या वतीने सत्कार करण्यात आला.

 

आम्ही सर्व ताकदीनिशी लढतोय पण बेळगावातील मराठी जनतेची याकामी साथ लाभायला हवी. गेली ६२ वर्षे अनेकांनी या लढ्यासाठी हौतात्म्य दिले त्यांना नतमस्तक होण्यासाठी मी बेळगावला गेलो. माझे कोणत्याही भाषेशी वैर नाही तशीच भूमिका बाकीच्या नेत्यांनी मराठीबाबत स्वीकारावी अशी माझी भावना आहे. मी मुख्यमंत्री असताना कोयनेचे पाणी कर्नाटकला देऊन शेजारधर्म पाळला होताच, असे त्यांनी नमूद केले.

 

गेली ५० वर्षे संसदीय कार्य करताना हे जाणवले की बेळगावचा सीमाप्रश्न सुटावा ही सगळ्यांचीच भावना आहे. मी हा प्रश्न बेळगाव पुरताच मर्यादित ठेवत नाही तर बिदर व भाल्कीचाही विचार करतो. आगामी निवडणुका अखेरचा टप्पा आहेत. तेव्हा मतभेद विसरून सगळ्यांनी एक होऊन आमदार निवडून आणायला हवेत, असे आवाहन त्यांनी केले.

संबंधित लेख