जयंतरावांच्या खांद्यावर जी जबाबदारी सोपवली आहे त्यात ते यशस्वी होतील - खा. शरद पवार

30 Apr 2018 , 09:39:36 PM

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पक्षांतर्गत नियुक्त्या लोकशाही मार्गाने पुणे येथे जाहीर करण्यात आल्या. यावेळी आ. जयंत पाटील यांच्याकडे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदाची सूत्रे सोपवण्यात आली. यावेळी प्रदेश उपाध्यक्षपदी नवाब मलिक, प्रदेश कोषाध्यक्षपदी आ. हेमंत टकले तसेच प्रदेश सरचिटणीसपदी शिवाजीराव गर्जे यांची सर्वानुमते नियुक्ती करण्यात आली.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी जयंतरावांच्या खांद्यावर जी जबाबदारी सोपवली आहे त्यात ते यशस्वी होतील आणि कार्यकर्त्यांची साथ त्यांना लाभेल अशी अपेक्षा व्यक्त केली. आजच्या आव्हानात्मक काळात मावळते प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी एकत्र बसून एक रणनीती तयार करावी. समाजातील प्रत्येक घटकाला न्याय मिळावा, संधी मिळावी यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसपक्षातर्फे प्रयत्न करण्याची सुचना केली.

यावेळी प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सुपूर्द केल्याबद्दल आ. जयंत पाटील यांनी आदरणीय शरद पवार साहेब व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आभार मानले. १९९९ साली आदरणीय पवार साहेबांनी अर्थमंत्री पदाची जबाबदारी दिली. स्वतःचा मुलगा म्हणून, स्वतःच्या घरातला माणूस म्हणून माझ्यावर जबाबदाऱ्या टाकल्या. आजही या जबाबदारीचे गांभीर्य मला आहे. ते समजून त्याच पद्धतीने काम करण्याचे आश्वासन जयंत पाटील यांनी दिले. तसेच पक्षात निरंतर सुधारणा करण्याची गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. त्यासाठी कार्यकर्त्यांची साथ मिळण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

यावेळी मावळते प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी पडत्या काळात पक्षाला साथ देणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या प्रत्येक कार्यकर्त्याचे आभार मानले. जयंत पाटील महाराष्ट्राच्या राजकारणात एक मोठे नाव आहे. पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी जयंतरावांवर सोपवताना मला समाधान वाटतंय असे मत त्यांनी व्यक्त केले. ते नक्कीच राष्ट्रवादीला सत्ता संपादन करून देतील असा विश्वास व्यक्त केला.

यावेळी खा. प्रफुल पटेल यांनी पक्ष स्थापनेपासून पक्षासाठी भरीव कामगिरी करणाऱ्या सुनिल तटकरे यांचे आभार मानले. त्यांची भरीव कामगिरी पाहूनच पवार साहेबांनी त्यांना राष्ट्रीय सरचिटणीस पदी पदोन्नती दिली असल्याचे वक्तव्य केले. आज देशभरातील सर्व नेते पवार साहेबांच्या मार्गदर्शनासाठी आतूर असल्याचे मत व्यक्त केले.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधिमंडळ गटनेते अजित पवार यांनी नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल अभिनंदन केले. चार वर्षे सुनिल तटकरे यांनी चौफेर बॅटींग करत पक्षाची धुरा सांभाळली. आता ही जबाबदारी जयंत पाटील यांच्याकडे जात असल्याचे सांगत त्यांनी पक्षासाठी तरुण चेहरे शोधण्याची सुचना पाटील यांना केली.

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनीही सर्व कार्यकर्त्यांच्या साक्षीने प्रदेशाध्यक्षपदी निवड झालेल्या आ. जयंत पाटील यांचे अभिनंदन केले. तसेच २०१४ साली देशात, राज्यात सत्तांतर झाल्यावर कठीण परिस्थितीतही पक्षाला बळकटी देण्यात यशस्वी ठरलेले मावळते प्रदेशाध्यक्ष आ. सुनिल तटकरे यांचे आभार मानले. येत्या निवडणुकींच्या काळात संघटना मजबूत करण्याचे काम महत्त्वाचे आहे. नव्या प्रदेशाध्यक्षांच्या नावातच जय आहे त्यामुळे राष्ट्रवादीचे भविष्य उज्ज्वल आहे असे वक्तव्य करत त्यांनी पवार साहेबांचे स्वप्न साकार करण्याचे आश्वासन दिले.

संबंधित लेख