विधान परिषद निवडणुकांसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी - नवाब मलिक

03 May 2018 , 11:25:06 PM

गेले काही दिवस काँग्रेस - राष्ट्रवादीच्या आघाडीबाबत सर्वत्र चर्चा सुरू होती. याबाबतीत दोन्ही पक्षांचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण आणि जयंत पाटील, तसेच त्यांचे प्रभारी मोहन प्रकाश, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रफुल पटेल, आणि काँग्रेस नेते अशोक गहलोत यांच्यात चर्चा होऊन निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मुख्य प्रवक्ते व प्रदेश उपाध्यक्ष नवाब मलिक यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

या चर्चेअंती विधान परिषद निवडणुकांसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने आघाडी करून प्रत्येकी तीन जागा लढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राष्ट्रवादी उस्मानाबाद-बीड-लातूर, नाशिक, कोकण तर काँग्रेस अमरावती, वर्धा, परभणी या जागा लढवणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे रमेश कराड (लातूर), शिवाजी सहाणे (नाशिक), अनिकेत तटकरे (रायगड) यांना उमेदवारी देण्यात आली आहे, अशी माहितीही त्यांनी दिली. तसेच २८ जून रोजी लोकसभा आणि विधानसभा पोटनिवडणुका राज्यात होणार आहेत.

पलूसमध्ये स्व. पतंगराव कदम यांच्या निधनामुळे रिक्त झालेली जागा काँग्रेस लढवणार आहे. लोकसभा पोटनिवडणुकीत पालघर येथील जागा काँग्रेस लढवेल, तर भंडारा-गोंदिया येथील जागा राष्ट्रवादी काँग्रेस लढेल. या निर्णयावर पक्षश्रेष्ठींनी शिक्कामोर्तब केला आहे, असेही त्यांनी सांगितले.

त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचे सातवे राष्ट्रीय अधिवेशन ९ व १० जून रोजी पुणे येथे घेण्यात येणार आहे. ९ तारखेला पक्षाच्या विस्तारित कार्यकारिणीची बैठक होऊन त्यात पक्षाचा अजेंडा चर्चिला जाईल. १० जून रोजी देशभरातील प्रतिनिधींचे संमेलन होईल तसेच जाहीर सभेचे आयोजन करण्यात येईल, अशीही माहिती त्यांनी दिली.

संबंधित लेख