अहमदनगरमध्ये कायद्याचे राज्य नाही तर जंगलराज - नवाब मलिक

04 May 2018 , 12:07:45 AM

अहमदनगरमधील जामखेड येथे २८ एप्रिल रोजी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन युवा कार्यकर्त्यांची हत्या झाल्याच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री राम शिंदे यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते आणि प्रदेश उपाध्यक्ष नवाब मलिक यांनी केली आहे. अहमदनगरमध्ये कायद्याचे राज्य नाही तर जंगलराज सुरू असल्याचा आरोप मलिक यांनी आज मुंबई पक्ष कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत केला.

२८ एप्रिल रोजी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन कार्यकर्त्यांची हत्या करण्यात आली. या घटनेतील आरोपी अजूनही फरार आहेत, आरोपींना अटक झालेली नाही. देशी बनावटीचा कट्टा वापरून या हत्या झाल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. काही महिन्यांपूर्वी जामखेड येथेच डॉ. शेख यांच्यावरही देशी कट्टा वापरून हल्ला करण्यात आला होती, मात्र सुदैवाने ते या हल्ल्यात बचावले, ही बाब त्यांनी निदर्शनास आणली.

जलसंधारण व राजशिष्टाचार मंत्री राम शिंदे हे या भागाचे पालकमंत्री असूनही जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेचा बोजवारा उडालेला आहे, असे मलिक म्हणाले. या भागात तीन-साडेतीन वर्षे कोणीही अधिकारी नसून सर्व कारभार अतिरिक्त अधिकाऱ्यांमार्फत सुरू आहे. घटना घडल्यानंतर आता पूर्णवेळ अधिकारी नेमण्याचे आदेश देण्यात आलेले आहे. जिल्ह्यात पालकमंत्र्यांचा मनमानी कारभार सुरु असून जामखेडचं बिहार झालं असल्याचा आरोप मलिक यांनी केला. गुंडांचा वापर करून राजकारण करण्याचे काम मंत्री करत आहेत, त्यामुळे त्यांना मंत्रिमंडळातून बडतर्फ करावे, तसेच मुख्यमंत्र्यांनी या भागाकडे लक्ष द्यावे, अशी मागणी मलिक यांनी केली.

संबंधित लेख