भाजप जिन्हा हाऊसवरून केवळ राजकारण करत आहे - नवाब मलिक

04 May 2018 , 06:29:03 PM

अलीगढ विद्यापीठातील जिन्हांच्या फोटोवरून झालेल्या वादानंतर आता मुंबईतील जिन्हा हाऊस वरूनही वाद सुरू झाला आहे. भाजप जिन्हांचे जिन बाहेर काढून स्वतःचे अस्तित्व टिकवण्याचा प्रयत्न करत आहे. अलीगढ विद्यापीठातील जिन्हांचा फोटो एचआरडीने आधीच का काढला नाही, असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते व प्रदेश उपाध्यक्ष नबाब मलिक यांनी उपस्थित केला. ते मुंबईतील पत्रकार परिषदेत बोलत होते. भाजप आमदार मंगलप्रभात लोढा यांनी मुंबईतील जिन्हा हाऊस तोडण्याची मागणी केली. आम्ही म्हणतो जिन्हा हाऊस उद्या तोडायचं असेल तर आजच तोडा. दिल्लीपासून गल्लीपर्यंत भाजपचे सरकार आहे. जर हे करता येत नसेल तर पंतप्रधान व मुख्यमंत्री यांनी राजीनामा द्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

जिन्हांचा विषय काढून मुद्दाम वाद वाढवला जात आहे. सरकार भाजपचे आहे, मागणी न करता थेट कारवाई करा. भाजपचे ज्येष्ठ नेते अडवाणी यांनी जिन्हांच्या कबरीवर चादर चढवली होती. त्यांच्यावर भाजपने कारवाई का केली नाही? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. भाजप आता जिन्हांच्या मुद्द्यावरून राजकारण करत आहे, असा आरोप मलिक यांनी केला. हे सरकार लोकांचे प्रश्न सोडवण्यास अपयशी ठरले आहे. त्यामुळेच असे राजकारण केले जात आहे. मुख्यमंत्र्यांनी जर जिन्हा हाऊस तोडण्याची कारवाई केली तर आम्ही त्यांचे हार घालून अभिनंदन करू, असेही त्यांनी सांगितले.

संबंधित लेख