भुजबळ साहेब लढवय्ये आहेत, ते पुन्हा संघर्ष करून उभे राहतील – अजित पवार

05 May 2018 , 06:30:14 PM

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आ. छगन भुजबळ यांना तब्बल दोन वर्षांनी मुंबई हायकोर्टाने जामीन मंजूर केला. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्वच ज्येष्ठ नेत्यांनी न्यायालयाच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे.

भुजबळ साहेबांना जामीन मिळाला याचा मनापासून आनंद झाला असल्याची प्रतिक्रिया विधिमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी व्यक्त केली. जामीन मिळणं हा भुजबळ साहेबांचा न्याय्य हक्क होता, दुर्दैवाने हा न्याय्य हक्क मिळायला खूपच उशीर झाला असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. परंतु भुजबळ साहेब लढवय्ये आहेत, ते पुन्हा संघर्ष करून उभे राहतील, त्यांच्या नेतृत्व मार्गदर्शनाखाली पक्ष पुन्हा उभारी घेईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. जनतेच्या न्यायालयात त्यांचं निर्दोषत्व आधीच सिद्ध झालंय, येणाऱ्या काळात त्यांचं निर्दोषत्व न्यायालयातही सिद्ध होईल. मी आणि पक्ष त्यांच्या पाठीशी सोबत भक्कमपणे उभे आहोत असे ते ठामपणे म्हणाले.

"भगवान के घर देर है, पर अंधेर नहीं" असे म्हणतात, त्याचा प्रत्यय आज आला अशी प्रतिक्रीया खासदार सुप्निया सुळे यांनी व्यक्त केली. त्यांनी मनापासून महाराष्ट्राच्या समस्त जनतेचे आणि न्यायालयीन वकिलांचे आभार मानले. या निर्णयामुळे भुजबळ साहेबांना थोडासा दिलासा आणि न्याय मिळाला असे मत त्यांनी व्यक्त केले. व्यक्ती दोषी नसताना, चौकशी सुरू असताना दोन वर्ष तुरूंगात ठेवले जाते, हा अन्याय असल्याची टीका त्यांनी केली. भुजबळ साहेब बाहेर यावे यासाठी आम्ही दबाव टाकत असल्याचा आरोप काहीजण करत आहे. आमचा पक्ष सत्तेत नसताना आम्ही दबाव निर्माण कसा करणार? न्यायालयाच्या पारर्दशकतेवर इतकाही विश्वास नाही का? असा सवाल त्यांनी केला. हा राजकीय सूड आहे. महाराष्ट्राच्या राजकारणाची पातळी इतक्या खालच्या पातळीवर कधीच गेली नसल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. यापुढची लढाई आपण सर्वजण लढू. भुजबळ साहेबांना न्याय मिळेपर्यंत राष्ट्रवादीचा एकही कार्यकर्ता स्वस्थ बसणार नाही असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

खासदार प्रफुल पटेल यांनी न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत केले. भुजबळ साहेबांना जामीन मिळाला याचे आम्हाला समाधान असल्याचे वक्तव्य त्यांनी केले. लवकरच सत्य समोर येईल आणि भुजबळ साहेबांना न्याय मिळेल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

भुजबळ साहेबांना आज न्यायालयाकडून जामीन मिळाला त्यावर आम्ही समाधानी आहोत अशी प्रतिक्रिया राष्ट्रीय सरचिटणीस सुनिल तटकरे यांनी व्यक्त केली. न्यायव्यवस्थेवर आमचा पूर्णपणे विश्वास असून या सर्व प्रकरणातून ते निश्चितच बाहेर पडतील अशी खात्री त्यांनी व्यक्त केली.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष नवाब मलिक यांनी भुजबळ यांच्या सुटकेनंतर आनंद व्यक्त केला. मी स्वत: तसेच अनेक कार्यकर्ते त्यांच्या संपर्कात होते. त्यांना जामीन मिळावा हाच आमचा प्रयत्न होता. भुजबळ साहेब निर्दोष मुक्त होतील अशी खात्री त्यांनी व्यक्त केली.

ओबीसी, बहुजनाचे आधारस्तंभ मा. छगन भुजबळ यांना जामीन मंजूर झाल्याने ओबीस वर्गाला दिलासा मिळाला असल्याचे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष ईश्वर बाळबुधे यांनी केले.

संबंधित लेख