खा. शरद पवार यांची पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांना पुण्यतिथीदिनी आदरांजली

10 May 2018 , 06:38:53 PM

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुण्यतिथीदिनी सातारा येथील त्यांच्या समाधीस्थळी भेट देऊन अभिवादन केले. या निमित्त दरवर्षीप्रमाणे याही वर्षी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या नावाने राष्ट्रीय पुरस्कार देण्यात आले. यावर्षी कृषी क्षेत्रात मोठं योगदान देणारे डॉ. चारुदत्त मायी यांना पद्मविभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. तसेच, दुग्धविकास बोर्डाच्या अध्यक्षा डॉ. अमृता पटेल यांना रयत माऊली लक्ष्मीबाई पाटील राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आले. या समारंभात गुणवंत विद्यार्थी, गुणवंत सेवक, उत्कृष्ट शाखा, उत्कृष्ट महाविद्यालय, संस्थेच्या गुणात्मक विकासासाठी प्रयत्न करणारे देणगीदार आणि राष्ट्रीय व राज्य पातळीवर पुरस्कार पटकावलेल्या शिक्षकांचेही सत्कार करण्यात आले. 
समाजाच्या विकासासाठी रयत शिक्षण संस्था अनेक वर्षांपासून कार्यरत आहे. या संस्थेचे बीज कर्मवीर भाऊराव पाटील यांनी रोवले. एवढ्या मोठ्या संस्थेची उभारणी करून शिक्षण क्षेत्रात उत्तुंग असे आंतरराष्ट्रीय दर्जाचे काम करणारे कर्मवीर भाऊराव पाटील एकमेव समाजसुधारक होते. रयत शिक्षण संस्था आज त्यांचाच वैचारिक वारसा चालवत आहे आणि यापुढेही भविष्याचा वेध आणि काळाची गरज लक्षात घेऊन कृषी तंत्रज्ञान, संशोधन, मनुष्यबळनिर्मिती, उद्योग इत्यादी क्षेत्रात रयत शिक्षण संस्था पारदर्शक काम करेल, अशी ग्वाही शरद पवार यांनी दिली. यासाठी संस्था नाविन्यपूर्ण संशोधन, सर्जनशीलता आणि कल्पनाविकास या तीन क्षेत्रात शताब्दी वर्षापासून अधिक जोमाने काम करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 

पवार पुढे म्हणाले की, आजच्या समाजाची गरज लक्षात घेऊन उत्कृष्ट दर्जाचे मनुष्यबळ निर्माण करण्यासाठी संस्था टाटा टेक्नोलॉजी, एस.टी.पी. यांच्या सहयोगातून इन्व्हेन्शन, इन्होवेशन, व इनक्युबेशन या केंद्रांची उभारणी करणार आहे. खारघर व हडपसर व सातारा या तीन ठिकाणी केंद्रांची उभारणी केली जाईल तर भविष्यात अहमदनगर येथे चौथ्या केंद्राची उभारणी केली जाणार आहे. या माध्यमातून नवीन उद्योजकांना प्रशिक्षण देणे, उच्च दर्जाच्या तंत्रज्ञानाचे मार्गदर्शन करणे आणि नवनिर्मिती करणाऱ्या उद्योजकांना प्रोत्साहित करणे, या उद्देशाने प्रेरित होऊन हे प्रकल्प उभारले जाणार आहेत. टाटा टेक्नोलॉजी ही संस्था सध्या १२३ कंपन्यांना सोबत घेऊन जगभरात कार्यरत आहे. त्यांच्या सहयोगाने रयत शिक्षण संस्था चांगल्या प्रकारचे मनुष्यबळ निर्माण करेल आणि भविष्यातही रयत शिक्षण संस्था समाजाच्या विकासासाठी काम करेल, असा विश्वास पवार यांनी व्यक्त केला. 

संबंधित लेख