'स्काय इज द लिमिट' ही पक्षाची कार्यपद्धती आहे - जयंत पाटील

10 May 2018 , 08:30:40 PM

गुरूवारी मुंबई येथील प्रदेश कार्यालयात प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी युवा कार्यकर्त्यांची आढावा बैठक घेतली. यावेळी त्यांनी पदाधिकाऱ्यांची कार्यपद्धती जाणून घेत, पक्षविस्ताराविषयी सविस्तर चर्चा केली. 'स्काय इज द लिमिट' ही आपली काम करण्याची पद्धत आहे, असे म्हणत बुथ कमिटीवर आपल्याला भर द्यायचा आहे असे मत जयंत पाटील यांनी मांडले. पक्षाच्या राष्ट्रीय अधिवेशनात याबाबत सविस्तर माहिती दिली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. आपल्याला ९१ हजार ४०० बुथ पर्यंत पोहोचायचे आहे, हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या युवा कार्यकर्त्यांनी लक्षात घ्यावं. पार्टीची मोट बांधताना समाजातील सर्व घटकांना संधी मिळायला हवी हे आपण लक्षात घेतले पाहिजे, असा संदेश यावेळी जयंत पाटील यांनी दिला. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची खरी ताकद फक्त युवकच आहेत असे पाटील यांनी ठामपणे सांगितले. कार्यकर्त्यांनी फलक लावण्यावर वायफळ खर्च करु नये अशी तंबी देत पक्षाला पोस्टरबाजीत मुळीच रस नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. तरुणांनी एक व्यवस्था निर्माण करावी, हीच व्यवस्था आपल्याला राज्यातील मोठा पक्ष बनवेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

यावेळी राष्ट्रवादी युवक प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते पाटील यांनी कार्यकर्त्यांना जोमाने काम करण्यास सांगितले. पक्षाची विविध धोरणे अमलात आणण्यासाठी युवक संघटना सिंहाचा वाटा उचलेल असे आश्वासन त्यांनी दिले. या बैठकीसाठी कोषाध्यक्ष हेमंत टकले, सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, प्रवक्ते महेश तपासे आणि इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

संबंधित लेख