ऊस उत्पादक शेतकरी भाजप सरकारला घरी बसवल्याशिवाय राहणार नाही - जयंत पाटील

14 May 2018 , 10:42:33 PM

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सोमवार, दि. १४ मे २०१८ रोजी विविध विषयांवर प्रसारमाध्यमांशी बोलताना भाष्य केले. औरंगाबाद येथे घडलेल्या दंगलीबाबत बोलताना त्याठिकाणी पोलिसांनी केवळ बघ्याची भूमिक घेतली याबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली. काही पक्षाचे नेते या दंगलीचे नेतृत्व करताना दिसत होते, त्यामुळे सरकारच ही परिस्थिती घडवून आणत आहे की काय? असा प्रश्न पाटील यांनी उपस्थित केला.

भारतातील साखरेचे दर गडगडल्यामुळे देशातील शेतकरी हवालदिल झाला आहे. अशावेळी केंद्र सरकारने मदत करणे गरजेचे आहे, त्यामुळे चर्चा करण्यासाठी आणि तोडगा काढण्यासाठी खा. शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची वेळ मागितली आहे. लवकरच ही बैठक होईल आणि साखरेबाबत तोडगा काढला जाईल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली. साखर निर्यात करण्यासाठी सरकारने सात महिन्यांपूर्वीच परवानगी द्यायला हवी होती. अतिरिक्त साखर उत्पादनाची माहिती असूनही सरकारने वेळेवर योग्य पावले उचलली नाहीत. देशातील सुमारे ७० लाख टन साखर निर्यात केल्याशिवाय साखरेचे दर स्थिर होणार नाहीत, असे ते म्हणाले. हा ऊस उत्पादक शेतकरी भाजप सरकारला घरी बसवल्याशिवाय राहणार नाही, असेही ते म्हणाले.

भारतात २५ रु. दरात साखर उपलब्ध आहे, पाकिस्तानमध्ये १९ रुपयांत साखर उपलब्ध आहे. पाकिस्तानमधून साखर आयात करताना आयात कर भरला आहे का? ही साखर गैरमार्गाने तर भारतात आली नाही ना, हे तपासायला हवे असे पाटील यांनी सांगितले. पाकिस्तानच्या शेतकऱ्यांना मदत करण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री फडणवीस यांनी थांबवावे, असेही ते म्हणाले.

पेट्रोल-डिझेलच्या अनियंत्रित दरांबद्दल बोलताना जयंत पाटील म्हणाले की, पेट्रोलचे दर नियंत्रित करणे हे सरकारच्या हातात आहे. परंतु असे न करता जनतेची होरपळ करण्याचे काम सरकार करत आहे. यावेळी इंधनवाढीचा पाटील यांनी निषेध केला.

संबंधित लेख