मुलुंड नाक्यावर राष्ट्रवादीचे ’टोल फ्री’ आंदोलन!

16 May 2018 , 06:28:35 PM

मुंब्रा बायपासच्या दुरुस्तीच्या कामांमुळे मोठ्या प्रमाणात नागरिकांना वाहतूक कोंडीचा त्रास सहन करवा लागत असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने सोमवारी मुलुंड टोल नाक्यावर आंदोलन करुन टोल न भरता गाड्यांना सोडण्यात आले. आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. मुंब्रा बायपास हा धोकादायक झाला होता. या बायपासवरील दुरुस्तीच्या कालावधीत वाहन चालकांचा त्रास कमी करण्यासाठी एकच टोल भरण्याची घोषणा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दुरुस्तीचे काम सुरु होण्यापूर्वी केली होती. त्यामुळे वाहन चालकांना एक तर ऐरोली किंवा मुलुंडचा असा एकच टोल भरावा लागणार होता. पालकमंत्र्यांची ही घोषणा हवेतच विरली असली तरी आम्हाला दोन्ही टोल मान्य नाही, असे आव्हाड यांनी स्पष्ट केले. आम्ही टोलनाके सुरु करु देणार नाही असा इशारा त्यांनी दिला. हे आंदोलन सुरु असतानाच येथून पालकमंत्री गेले आहेत. मात्र, या पालकमंत्र्यांना आंदोलनाची साधी चौकशी करण्याची गरज भासत नाही, हे माणुसकी नसल्याचे लक्षण आहे, अशी टीका त्यांनी केली. जर टोल बंद केला नाही तर नियमितपणे गनिमी काव्याने येथे येऊन आम्ही टोल वसुली बंद करु, असा इशाराही त्यांनी दिला.

यावेळी शहराध्यक्ष आनंद परांजपे, नगरसेवक सुहास देसाई, शानू पठाण ओबीसी सेलचे शहराध्यक्ष राजा राजपूरकर, अनुसूचित जाती सेलचे कैलास हावळे, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे शहराध्यक्ष अभिजीत पवार, ठाणे शहर विधानसभा कार्याध्यक्ष विजय भामरे, हेमंत वाणी, ब्लॉक अध्यक्ष समीर पेंढारे, रवी पालव, कुलदीप तिवारी, समीर भोईर आदींसह शहर कार्यकारिणीचे सर्व सदस्य तसेच राष्ट्रवादी पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

संबंधित लेख