लोकशाही टिकवायची असेल तर बॅलेट पेपरवर निवडणूक घ्यावी – जयंत पाटील

16 May 2018 , 06:51:59 PM

प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मंगळवारी ठाणे येथे पत्रकारांस संबोधित केले. कर्नाटक राज्याच्या विधानसभा निवडणुकांच्या निकालावर त्यांनी यावेळी भाष्य केले. कर्नाटकातील निकालास गृहित धरून त्यांनी इव्हीएम मशिनबाबत साशंकता व्यक्त केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेली लोकशाही टिकवायची असेल तर बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्याची गरज आहे असे मत पाटील यांनी व्यक्त केले. अनेक देशात इव्हीएम पद्धतीने निवडणुका बंद केल्या आहेत. त्यामुळे आता बॅलेट पद्धतीने निवडणूक होणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले. यानंतरही जर भाजप निवडणुकांमध्ये इव्हीएम मशिनचा आग्रह धरत असेल तर त्यांनी निवडणूक घेणेच बंद करावे असे टीकात्मक विधान त्यांनी केले. फोडतोड करून सत्ता स्थापन करणे ही भाजपची आधीपासूनची भूमिका आहे. कर्नाटकात आज काँग्रेस आणि जेडीएस पक्ष सत्ता स्थापन करण्यासाठी एकत्र आले आहेत, त्यांना राज्यपालांनी आधी संधी द्यायला हवी असे मत पाटील यांनी व्यक्त केले.

भाजप निवडणूक जिंकण्याची मशीन आहे. कर्नाटकाचे मतदान झाल्या-झाल्या पेट्रोल डिझेलचे भाव वाढले. भाजपसाठी मतदानाची किंमत शून्य आहे. भाजपामध्ये स्वपक्षातील लोक नाराज आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादीतून उमेदवार आयात करण्याची भाजपची जी खोड आहे यावरून ते अजून कमकुवत आहेत हेच सिद्ध होते, असे मत त्यांनी व्यक्त केले. तसेच पालघरमध्ये होऊ घातलेल्या लोकसभा पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी संपूर्ण ताकदीने काँग्रेसच्या पाठिशी उभी राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

ठाणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीसाठी महत्त्वाचे आहे. शहरातील समस्या वेगळ्या आहेत. या भागातील नागरिकांचे मनं जिंकण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रत्येक कार्यकर्ता सज्ज असल्याचे ते म्हणाले. यावेळी आ. जितेंद्र आव्हाड, शहराध्यक्ष आनंद परांजपे, माजी विरोधी पक्षनेते ठाणे मनपा हनुमंत जगदाळे, नगरसेवक नजीब मुल्ला, नगरसेवक प्रमिला केणी, मुकुंद केणी, सुहास देसाई, कळवा तालुका अध्यक्ष प्रकाश पाटील इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

संबंधित लेख