पी.एचडी, नेट-सेट धारक विद्यार्थ्यांचे आझाद मैदानात उपोषण; प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांना साकडे

16 May 2018 , 08:03:52 PM

राज्यात ११,५०० सहाय्यक प्राध्यापकांच्या जागा रिक्त असून यातील एकही जागा भरली गेली नाही. त्यामुळे पी.एचडी, नेट-सेट धारक विद्यार्थ्यांमध्ये बेरोजगारीची संख्या वाढत आहे. या जागा लवकरात लवकर भरण्यात याव्या, शिक्षकांचे प्रलंबित वेतन देण्यात यावे अशा विविध मागण्यांसाठी पी.एचडी, नेट-सेट धारक विद्यार्थ्यांनी आझाद मैदानात उपोषण केले. उपोषणस्थळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमदार विक्रम काळे यांनी भेट दिली. दरम्यान हे प्रश्न मार्गी लावण्यासाठी या विद्यार्थ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या नेत्यांना साकडे घातले आहे.

सरकारकडे वेळोवेळी या मागण्यांबाबत पाठपुरावा केल्यानंतरही सरकारने लक्ष दिले नाही. सरकारकडून प्रत्येक वेळी थातूरमातूर उत्तरे दिली जात आहेत अशी खंत विद्यार्थ्यांनी व्यक्त केली. खासदार सुप्रिया सुळे, विधिमंडळ पक्षनेते अजित पवार, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यासमोरही आम्ही हा प्रश्न मांडला आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी वेळोवेळी आमच्या प्रश्नांचा पाठपुरावा केला आहे. या पुढेही खासदार सुळे यांनी लोकसभेत हा प्रश्न उपस्थित करावा तेव्हाच आम्हाला न्याय मिळेल अशी विनंती विद्यार्थ्यांनी केली.

दरम्यान सरकार जाणीवपूर्वक विद्यार्थ्यांचे नुकसान करत आहे अशी टीका आमदार विक्रम काळे यांनी केली. विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन तरी सरकारने ही पदे भरायला हवी होती असे ते म्हणाले. या संदर्भात लवकरच खासदार सुप्रिया सुळे व मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन यासंदर्भात बैठक लावण्याची मागणी करेन असे आश्वासन विक्रम काळे यांनी दिले.

संबंधित लेख