राष्ट्रवादीच्या नगरसेविका सईदा खान यांचे पालिका आयुक्तांच्या दालनासमोर ठिय्या आंदोलन

18 May 2018 , 09:00:27 PM

मुंबई महानगरपालिका आणि एमएमआरडीए यांच्यातील वादामुळे कुर्ला येथील मिठी नदीलगत बांधण्यात येत असलेल्या संरक्षक भिंतीचे काम अर्धवट राहिले आहे. नागरिकांना होणाऱ्या या त्रासाविरोधात बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या नगरसेविका डॉ. सईदा खान यांनी पालिका आयुक्तांच्या दालनासमोर ठिय्या आंदोलन पुकारले.

२०१२ पासून एमएमआरडीएने संरक्षक भिंतीची निर्मिती करताना निर्माण झालेला कचरा आजही तसाच पडून आहे. हा ढिगारा हटवावा याबाबत वारंवार स्थानिक नागरिकांनी मागणी केली होती. परंतु त्याकडे जाणूनबूजून प्रशासनाकडून दुर्लक्ष करण्यात आले. यामुळे पावसाळ्यात नागरिकांच्या जिवाला धोका निर्माण होऊ शकतो. या प्रश्नाकडे लक्ष वेधत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या नगरसेविका डॉ. सईदा खान यांनी पालिकेला एक आठवड्याची मुदत दिली होती. मात्र तरीही पालिकेने लक्ष दिले नसल्याने डॉ. सईदा खान यांनी पालिका आयुक्त अजॉय मेहता यांच्या दालनासमोर ठिय्या आंदोलन पुकारले आहे. दरम्यान याबाबत माहिती घेण्यासाठी गेलेल्या माध्यम प्रतिनिधींनाही आयुक्तांच्या सुरक्षा रक्षकांनी मज्जाव घातला. नगरसेविका सईदा खान यांच्यासमवेत या ठिय्या आंदोलनामध्ये नगरसेवक कप्तान मलिक आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.

संबंधित लेख