सरकारची डाळ शिजू शकत नाही!

22 Jan 2016 , 04:56:04 PM

सरकारकडून स्वस्त तूरडाळ वाटप करण्याची घोषणा करण्यात आली होती, पण प्रत्यक्षात मात्र जनतेला स्वस्त तूरडाळ उपलब्ध झालीच नाही. जी काही तूरडाळ सरकारने बाजारात उपलब्ध करुन दिली ती तूरडाळ स्वयंपाक घरात शिजत नसल्याबाबत महिला वर्गाच्या असंख्य तक्रारी येत होत्या. त्यामुळे या प्रश्नांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आज राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने प्रदेशाध्यक्षा चित्राताई वाघ यांच्या नेतृत्वाखाली ‘राष्ट्रवादी भवना’ समोर सरकारची तूरडाळ शिजविण्याचे प्रात्यक्षिक ‘कुकरी शो’ या आंदोलनातून करण्यात आले. या आंदोलनात माजी महिला प्रदेशाध्यक्षा उषाताई दराडे, नाशिक जिल्हाध्यक्ष रविंद्र नाना पगार, कोकण विभागीय युवती संघटक आदिती तटकरे, मुंबई महिला उपाध्यक्षा सोनल पेडणेकर, सरचिटणीस शोभाताई कोळवणकर, दक्षिण मुंबई महिला जिल्हाध्यक्षा उमा भास्करन, दक्षिण-मध्य मुंबई जिल्हाध्यक्षा वंदनाताई माने आदीसह सर्व तालुकाध्यक्ष, महिला पदाधिकारी-कार्यकर्त्या उपस्थित होत्या.

याप्रसंगी ‘राष्ट्रवादी भवना’ समोर सर्व महिला कार्यकर्त्यांनी बैठक मांडून सर्व माध्यम प्रतिनिधींसमोर गॅस शेगडीवर सरकारकडून उपलब्ध करून देण्यात आलेली डाळ शिजविण्याचे प्रात्यक्षिक करून दाखवले. साधारणतः डाळ कुकरच्या दोन-तीन शिट्ट्यांमध्ये शिजते. परंतु ही सरकारी डाळ पाच शिट्ट्यांनंतरदेखील शिजली नाही. तसेच या डाळीला वाटाण्याचा वास येत असून ही डाळ खाण्यायोग्य नसल्याचे दिसून येत होते.

"एकीकडे आम्ही जनतेला शंभर रुपयांत डाळ उपलब्ध करुन दिलेली आहे असा विधानसभेत दावा करणाऱ्या मुख्यमंत्र्याची ही डाळ शिजता शिजत नाही. अद्याप ही बाजारात शंभर रुपयांत खाण्यायोग्य डाळ मिळत नाही. चांगल्या डाळेसाठी दीड-दोनशे रुपये गृहिणींना मोजावे लागत आहेत.त्यामुळे आज या आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही एकप्रकारे मुख्यमंत्र्यांच्या या दाव्याचा पर्दाफाश केला आहे. स्वस्त तूरडाळीचा दावा करणाऱ्या फडणवीस सरकारने महिलावर्गाचा विश्वासघात केलेला आहे." असे राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ म्हणाल्या. 

यावेळी महिलांच्या या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे व विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे उपस्थित होते.

संबंधित लेख