आ.राजेश टोपे यांना उत्कृष्ट भाषण पुरस्कार जाहीर

18 May 2018 , 09:26:29 PM

राज्य विधानसभा तसेच विधान परिषदेतील २०१५ ते २०१८ या काळातील उत्कृष्ट वक्ते आणि उत्कृष्ट भाषण पुरस्कार आमदार राजेश टोपे यांना जाहीर झाला आहे. कृषी, आरोग्य, शिक्षण, सिंचन, रस्ते, उद्योग, रेशीम उद्योग, महावितरण व सहकारसह अनेक विषयांवर आ. राजेश टोपे यांनी आपल्या अभ्यासपूर्ण भाषणाने विधान सभेत छाप पाडली आहे. आ. टोपे यांनी विधिमंडळाच्या पावसाळी, हिवाळी व अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये अनेक विषयांवर सभागृहामध्ये सरकारचे लक्ष वेधून सरकारला जनहिताचे निर्णय घेण्यास भाग पाडले.

विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर, विधानसभेचे अध्यक्ष हरीभाऊ बागडे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेतील सभागृह नेते चंद्रकांत पाटील, संसदीय कार्यमंत्री गिरीश बापट, विधानमंडळाचे प्रधान सचिव डॉ. अनंत कळसे, ज्येष्ठ पत्रकार सुकृत खांडेकर यांच्या निवड समितीने या पुरस्काराची निवड केली.
सभागृहातील आपल्या भाषणात आ.राजेश टोपे यांनी कर्जमाफी, पीकविमा, बोंडआळी, फळपीक विमा, कृषी विभागातील रिक्त जागा, शेतीमालाचे पडलेले बाजार भाव, हमी भाव, सोयाबीनसाठी वाढीव अनुदान, शेतीसाठी नवीन ट्रान्सफार्मर्स देणे, प्रलंबित असलेले वीजेचे प्रश्न, कृषी विद्यापीठातील रिक्त जागा, संशोधन, सौरउर्जा, सहकार क्षेत्रातील विविध प्रश्न त्यांनी मांडले. याशिवाय अवैध वाळू उपसा, अनुदानित, विनाअनुदानीत शिक्षकांचे प्रश्न, विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती, उच्च व तंत्रशिक्षणामधील प्रश्न, मुंबई विद्यापीठामुळे शिक्षण क्षेत्रात पसरलेली अस्वस्था, महाराष्ट्र कौशल्य विकास केंद्र, बेरोजगारीसारखी गंभीर समस्या त्यांनी सभागृहात अधोरेखित केल्या.

मराठा, धनगर व मुस्लीम आरक्षण, जायकवाडी समान पाणीवाटप, आरोग्य विभागातील रिक्त जागा, मराठवाडा अनुसेष, नोटाबंदी, जी.एस.टी., मेक इन इंडिया., मेक इन महाराष्ट्र, डिजीटल इंडिया, स्मार्ट सिटी, ग्रामीण भागातील रस्त्यांची झालेली बिकट परिस्थती, राज्यातील सर्व विभागातील रिक्त पदे आदी प्रश्नांवर सरकारला धारेवर धरले. सभागृहात शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आवाज उठवून आ.राजेश टोपे यांनी ऑनलाईन पिकविमा भरण्यास शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी सभागृहसमोर मांडून ऑफलाईन पिकविमा भरण्याची अनुमती मिळवून दिली.

अधिवेशनामध्ये तारांकित प्रश्न, लक्षवेधी, औचित्याचे मुददे यामधून शेतकरी, व्यापारी व सर्व सामान्याचे प्रश्न आ.राजेश टोपे यांनी उपस्थित केले. सदर प्रश्नाचे संबंधित मंत्र्यांकडून उत्तर घेऊन टोपे साहेब सतत पाठपुरावा करुन सामान्य जनतेचे प्रश्न सोडविण्याचे काम करीत आहे.

संबंधित लेख