सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय म्हणजे भाजप व कर्नाटकच्या राज्यपालांना मोठी चपराक - जयंत पाटील

18 May 2018 , 09:58:39 PM

सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय म्हणजे भाजप व कर्नाटकच्या राज्यपालांना मोठी चपराक आहे. १५ दिवस मुदत देऊन बहुमत सिद्ध करायला देणे हा निर्णय कसा चुकीचा आहे हे यातून सिद्ध होते, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी कर्नाटकातील सत्तास्थापनेबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचे स्वागत केले आहे.
काँग्रेस व जनता दल यांनी एकत्र येऊन ११४ आमदारांची संख्या गाठली. यामुळे विजय कोणाचाही झाला तरी सगळ्यात जास्त आमदार असणाऱ्यांना सत्ता स्थापन करू न देणे हा लोकशाहीचा अपमान आहे. सरकारने व तिथल्या राज्यपाल साहेबांनी लोकशाहीचा मान राखण्याचे टाळले तसेच लोकशाहीच्या मूल्यांना पायदळी तुडवले. परंतु सुदैवाने सर्वोच्च न्यायालयाने ही मूल्ये जपण्याचा निर्णय घेतला, अशी भावना पाटील यांनी व्यक्त केली.

राज्यपालांच्या वागण्यानेच भाजप सरकारला प्रत्येक राज्यात सोयीचा फॉर्म्युला वापरायला मिळाला. भारतात अनेक राज्यांत मोठ्या संख्येने निवडून आलेल्या पक्षांना डावलून मागच्या काळात सरकार स्थापन केले गेले, यामुळे सगळे जागे झाले आहेत. एखाद्या राज्यात आपली सत्ता आणण्यासाठी किती टोकाचा प्रयत्न करावा त्याचबरोबर साम दाम दंड भेद याचा वापर किती करावा याची मर्यादा भाजप सरकारने सोडली आहे, अशी टीका त्यांनी केली. भाजपाचा मूळ मतदार आता विस्कळीत झाल्याचे दिसून येतेय, सामान्य नागरिक अशा सरकारचा निषेध करतो, असे जयंत पाटील म्हणाले.

संबंधित लेख