राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शशिकांत शिंदे यांचा रूई गावातील जलसंधारणाच्या कार्यास हातभार

23 May 2018 , 08:21:56 PM

पाणी फाऊंडेशनच्या कामात सहभागी झालेल्या रूई या गावामध्ये 'एक धाव पाण्यासाठी मिनी मॅरेथॉन'चे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये पाणी फाउंडेशन, रूई व यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, सातारा मधील स्पर्धक सहभागी झाले होते. या ठिकाणी आमदार शशिकांत शिंदे यांनी उपस्थित राहून श्रमदान केले व रुई या गावाला या कार्यासाठी धनादेश दिला.

यावेळी बोलताना आमदार शिंदे यांनी या कामात सहभाग घेणाऱ्या सर्वांचे आभार मानले. दोन वर्षांच्या अपयशानंतर निसर्गावर दोन हात करण्याची ताकद फक्त रूईचे गावकरीच करू शकतात, आम्ही फक्त निमित्तमात्र असतो, परंतु किमया करण्याची ताकद ही तुमच्यामध्ये आहे, अशा शब्दांत त्यांनी श्रमदान करणाऱ्यांचे कौतुक केले. या गावामध्ये पाण्यासाठी सातत्याने टँकर लागत होता, परंतु इथल्या ग्रामस्थांनी तळे बनवून ती समस्या दूर होण्यास मदत केली, याबाबतही शिंदे यांनी ग्रामस्थांचे प्रयत्न वाखाणले. जलयुक्त शिवारसाठी या भागाला कसे पात्र करता येईल हा प्रयत्न आ. शशिकांत शिंदे यांच्या वतीने करण्यात आला होता. आज त्यांनी वैयक्तिकरीत्या धनादेश देऊन या गावाला जलसंधारणाच्या कामात मदत केली. स्पर्धेमध्ये फक्त बक्षीस महत्त्वाचे नाही, आपण जी मेहनत करत आहात त्यामुळे या गावाचे भविष्य घडत आहे, असे सांगत रूई गावाला बक्षीस मिळेल अशी आशा त्यांनी व्यक्त केली. आदरणीय पवार साहेबांमुळे रयत शिक्षण संस्थेच्या कार्यकारिणीवर आपल्याला संधी मिळाली, याचा उल्लेख करतानाच पाण्यासाठी ग्रामस्थ करत असलेल्या कार्याचे बक्षीस म्हणून रूई येथील शाळेच्या इमारतीसाठी निधी उपलब्ध करून देण्याचे त्यांनी जाहीर केले. येत्या एक-दोन वर्षांत या भागातही बागायत क्षेत्र निर्माण होईल, त्यादृष्टीने काम करण्याचे आवाहन शिंदे यांनी केले.

संबंधित लेख