युवकांची बैठक घेऊन आगामी महिन्यात बूथ कमिट्यांचा आढावा घेणार – जयंत पाटील

23 May 2018 , 10:06:53 PM

महापालिका क्षेत्रात युवकांची बूथनिहाय कमिटी असली पाहिजे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला त्यानुसारच कार्यकर्ते तयार करायचे आहेत. यासाठी आगामी काळात राज्यात ९१ हजार बुथ कमिट्या स्थापन केल्या जातील, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली. राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या #सांगली येथे झालेल्या मेळाव्यात ते बोलत होते.

या बुथ कमिट्या केवळ निवडणुकींसाठी नसतील तर मतदारांच्या समस्या सोडवणे, विकासाची कामे करणे यासाठी त्यांची स्थापना करण्यात येणार असून सक्षम बुथ कमिटी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला सक्षम करेल, असा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला. यावेळी आघाडीबाबत बोलताना राज्यात समविचारी पक्षाने एकत्र यावे ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची आधीपासूनची भूमिका असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

युवक मेळाव्यात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते पाटील यांनी भाजप आणि शिवसेनेवर सडकून टीका केली. भाजपचे कार्यकर्ते असल्यासारखे पोलीस वागत आहेत, राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था ढासळली असून गुन्हेगारी रोखण्यावर सरकारचा अंकुश राहिलेला नाही, अशी टीका त्यांनी केली. राज्यात सत्ता परिवर्तन करण्यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेस महत्त्वाची भूमिका बजावेल तसेच येत्या महिन्याभरात संपूर्ण राज्यात बुथ कमिट्या स्थापन केल्या जातील, अशी ग्वाही त्यांनी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना दिली. यावेळी जिल्हाध्यक्ष भरत देशमुख, जिल्हा परिषद सदस्य शरद लाड, ताजुद्दीन तांबोळी, पुणे महानगरपालिका वृक्ष प्राधिकरण समिती सदस्या शिल्पा भोसले, बाळासाहेब पाटील, जिल्हा संघटक दिपक उनऊने आदी मान्यवर उपस्थित होते.

संबंधित लेख