निरंजन डावखरे यांची पक्षातून सहा वर्षांसाठी हकालपट्टी – सरचिटणीस शिवाजीराव गर्जे

23 May 2018 , 11:13:32 PM

निरंजन डावखरे यांच्यावर विश्वास टाकून आमदारकी तसेच विदयार्थी व युवक प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी देऊन राज्याचे नेतृत्व करण्याची संधी पक्षाने दिली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने त्यांच्यासाठी आजपर्यंत अनेक उपलब्ध जागा आणि संधी देऊनही त्यांनी केवळ संधीसाधूपणामुळे दुसऱ्या पक्षात जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळेच त्यांची सहा वर्षांसाठी पक्षातून हकालपट्टी करण्यात येत असल्याची माहिती पक्षाचे सरचिटणीस शिवाजीराव गर्जे यांनी दिली. निरंजन डावखरे यांचा संधीसाधूपणाचा इतिहास बघता ते जिथे कुठे जाणार असतील त्या पक्षाला त्यांच्या या संधीसाधूपणाचा फटका केव्हातरी बसेल असा इशाराही शिवाजीराव गर्जे यांनी दिला.

निरंजन डावखरे यांना पहिल्या वेळेस वयोमर्यादेत बसत नसल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष उमेदवारी देऊ शकले नाही. मात्र वयाच्या अटीची पूर्तता होताच त्यांना विधानपरिषदेची आमदारकी दिली गेली. एकाच वेळी मुलगा आणि वडील विधान परिषदेचे आमदार बनवण्याचे काम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने केले आहे. स्व. वसंतराव डावखरे संकटात असताना पक्ष त्यांच्या पाठिशी खंबीर उभा राहिला. वसंतराव डावखरे यांना प्रदीर्घ काळ विधान परिषदेचे उपसभापती पद आणि उपाध्यक्ष पद पक्षाने दिले होते. असे असतानाही पक्षाने अन्याय केला म्हणणे योग्य नसल्याचे वक्तव्य शिवाजीराव गर्जे यांनी केले आहे.

संबंधित लेख