देशात आता मोदी लाट नाही तर मोदी लूट - धनंजय मुंडे

24 May 2018 , 06:57:53 PM

राज्यातील लोकसभेच्या पोटनिवडणुकीच्या प्रचारासाठी भाजपला दुस-या राज्यातील मुख्यमंत्र्यांना बोलवावे लागते ही भाजपाची मोठी शोकांतिका असून उद्या या निवडणुकीच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रचाराला आले तरी आश्चर्य वाटू देऊ नका असा टोला विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी लगावला आहे. देशात सध्या नरेंद्र मोदी यांची लाट नाही तर मोदी लूट सुरू आहे अशी टीकाही त्यांनी केली आहे. भंडारा-गोंदिया लोकसभेच्या पोटनिवडणुकीतील राष्ट्रवादी काँग्रेस - काँग्रेस आघाडीचे उमेदवार मधुकर कुकडे यांच्या प्रचारार्थ धनंजय मुंडे दोन दिवसांपासून भंडारा गोंदिया जिल्ह्यात असून बुधवारी त्यांनी गोंदिया जिल्ह्यातील गोरेगाव आणि नवेगाव अर्जुनी मोरगाव येथे जाहीर सभा घेतल्या. यावेळी व्यासपीठावर माजी मंत्री अनिल देशमुख राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक, आमदार प्रकाश गजभिये , माजी मंत्री रमेश बंग, माजी आमदार राजेंद्र जैन, ईश्वर बाळबुधे, नरेश माहेश्वेरी, दिलीप बनसोड आदी उपस्थित होते.

राज्यातील भाजपा नेत्यांना जनतेसमोर जायला तोंड आणि पत राहिली नाही म्हणून त्यांच्यावर उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांना राज्यात प्रचारासाठी बोलावण्याची वेळ आली आहे मात्र ज्यांना स्वतःच्या राज्यातील स्वतःची लोकसभेची जागा वाचवता आली नाही ते राज्यात येऊन काय उपयोग असा टोला लगावला.

सातत्याने वाढणा-या पेट्रोल डिझेलच्या भाववाढीवर बोलताना देशात आता मोदी लाट नाही तर मोदी लूट सुरू असल्याचे ते म्हणाले. पेट्रोल ८६ रुपयांवर, डाळ १५० रु आणि ४०० चे गॅस ८५० वर गेले तरी जनतेला राग कसा येत नाही? हा राग मतपेटीतून व्यक्त करण्याचे आवाहन त्यांनी केले.

मोदी आणि त्यांच्या शेतकरी, सर्वसामान्य विरोधी धोरणांना विरोध करणारा जिगरबाज नेता अशा शब्दांत त्यांनी नाना पटोले यांचा गौरव केला तर देशात भंडारा गोंदियाचे नाव करणारे प्रफुल पटेल यांचे हात बळकट करण्यासाठी मधुकर कुकडे यांना विजयी करण्याचे आवाहन केले.

संबंधित लेख