आता या सरकारविरोधात लढणेच युवक राष्ट्रवादीचे काम - संग्राम कोते पाटील

24 May 2018 , 10:59:24 PM

केंद्रात आणि राज्यात जनतेने भाजपला भरभरून मतदान केले. पण याच सरकारने जनतेवर सूड उगवला आहे. जनतेच्या हिताचा कोणताही निर्णय सरकारने घेतलेला नाही. याविरोधात विरोधी पक्ष म्हणून आम्ही आंदोलन सुरू केले तर पोलीस आयुक्त, अधिकारी व प्रशासनाकडून कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना धमक्या दिल्या जात आहेत, असा आरोप राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते पाटील यांनी केला असून आता या सरकारविरोधात लढणेच युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे काम आहे असे त्यांनी स्पष्ट केले. जिल्हा राष्ट्रवादी ग्रामीण युवक संघटनेच्यावतीने आयोजित पदाधिकारी व कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते
पुढे बोलताना ते म्हणाले की, राज्य सरकारने केलेली ३६ हजार नोकर भरतीची घोषणा फसवी आहे. सर्वच संवर्गातील विद्यार्थ्यांच्या स्कॉलरशिप बंद आहेत. स्कील डेव्हलपमेंट योजना म्हणजे एक फसवणूकच आहे. बेरोजगारांना काम मिळत नाही, बहुजनांना शिक्षण मिळत नाही, सुशिक्षितांना नोकऱ्या नाहीत तोपर्यंत या घोषणांचा काही उपयोग नाही. महिलाही आज सुरक्षित नाहीत. शासनाच्या विरोधात आता संघर्ष अधिक तीव्र करावा लागेल. आम्हाला धमक्या दिल्या, गुन्हे दाखल केले म्हणून आमचे काम थांबणार नाही, असा इशाराही कोते पाटील यांनी दिला.

यावेळी जिल्हाध्यक्ष विलासराव शिंदे, सरचिटणीस बाळासाहेब पाटील, जिल्हा परिषद गटनेते शरद लाड, प्रदेश उपाध्यक्ष ताजुद्दीन तांबोळी, पुणे महानगरपालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समितीच्या सदस्या शिल्पा भोसले आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

संबंधित लेख