पेट्रोल दर वाढीच्या निषेधार्थ राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीची पुणे शहरात विविध ठिकाणी निदर्शने

25 May 2018 , 06:14:41 PM

सततच्या पेट्रोल दरवाढीच्या निषेधार्थ गुरूवार, दि. २४ मे रोजी पुणे शहरातील कसबा,कॅन्टॉनमेंट,पर्वती विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी महिला कॉंग्रेस व विद्यार्थी कॉंग्रेसतर्फे आंदोलन करण्यात आले. अभिनव चौक येथे झालेल्या आंदोलनात खासदार वंदना चव्हाण देखील सहभागी झाल्या होत्या. गेले ३-४ वर्षे भारतीय नागरीकांना सातत्याने पेट्रोल-डिझेल दरवाढीला सामोरे जावे लागत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात प्रति बॅरेल इंधनाचा दर कमी असताना वा काही प्रमाणात स्थिर असताना देखील ही दरवाढ रोखण्यात भाजप सरकार सर्व स्तरावर अपयशी ठरले असून त्यामुळे सर्वाधिक दराने इंधन उपलब्ध होत असल्याचा नविन विश्व विक्रम भारत देश प्रस्थापित करेल, अशी टीका यावेळी चव्हाण यांनी केली. दुसऱ्या बाजूने विचार करता, इंधन पुरवठा करणाऱ्या देशांमध्ये युद्धजन्य परिस्थिती असताना भविष्याचा वेध घेऊन मुबलक इंधनाची तरतूद करणे आवश्यक असताना देखील केंद्रपातळीवरून याबाबत कोणतेच नियोजन करण्यात आलेले नसल्याचे चव्हाण म्हणाल्या. इंधन दरवाढ रोखायची असल्यास विविध कल्याणकारी योजना बंद कराव्या लागतील असे विधान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले आहे, त्यामुळे हे सरकार सामान्य नागरिकांच्या कल्याणाच्या विरोधातले सरकार असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाल्याचेही त्या म्हणाल्या. या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, विविध सेल प्रमुख आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

संबंधित लेख