राष्ट्रवादी सोशल मीडिया टीम वैचारिक संदेश तळागाळात पोहचवण्यासाठी सज्ज!

28 May 2018 , 10:44:58 PM

मुंबई प्रदेश कार्यालयात सोमवार, २९ मे रोजी पक्षाची राज्यस्तरीय सोशल मीडिया आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीसाठी जिल्हा स्तरावर कार्यरत असलेल्या समन्वयकांनी सहभागी होऊन आपल्या विविध कल्पना मांडल्या. या विविध कल्पनांचे स्वागत नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले तसेच सोशल मीडियाचा अधिक प्रभावीपणे वापर करण्यासाठी मोलाचे मार्गदर्शन केले.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या विचारधारेचा प्रचार करून दलित, ओबीसी, आदिवासी, अल्पसंख्याक, जनसामान्यांच्या हितासाठीच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्यांनी काम करावे असे वक्तव्य त्यांनी केले. कार्यकर्त्यांनी राज्यभरात सोशल मीडियाचे जाळे निर्माण करावे. सोशल मीडिया प्रभारी आनंद परांजपे यांनी विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, कोकण या सर्व विभागांचा दौरा करून कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्याचा सल्ला त्यांनी दिला. प्रत्येक जिल्ह्यातील प्रश्न वेगळे आहेत, स्थानिक प्रश्नांवर सोशल मीडियाच्या माध्यमातून वाचा फोडा. बदल घडला तर सर्वात आधी सत्कार हा सोशल मीडियाच्या कार्यकर्त्यांचा होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. जनतेच्या मनात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि या सरकारविषयी एक नकारात्मक वातावरण तयार झाले आहे. आपण या गोष्टीचा फायदा घेऊन परिवर्तन घडवुया असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला.

या बैठकीसाठी सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, आमदार राणाजगजित सिंह, सोशल मीडिया प्रभारी आनंद परांजपे, राष्ट्रवादी काँग्रेसचे संपादक सुधीर भोंगळे, आयटी सेलचे प्रदेशाध्यक्ष सारंग पाटील, युवक सरचिटणीस सुरज चव्हाण, सोशल मीडिया विभाग प्रमुख (पश्चिम महाराष्ट्र) रविकांत वर्पे, सौरभ त्रिभुवन उपस्थित होते.

संबंधित लेख