या सरकारचे नेमके चाललेय काय? - नवाब मलिक

29 May 2018 , 12:51:23 AM

पालघर, भंडारा-गोंदियामध्ये ईव्हीएम मशीनचा गैरवापर करत सरकार निवडणूक जिंकण्याचा प्रयत्न करत आहे. देशभरात ज्या ज्या ठिकाणी पोटनिवडणुका होत आहेत त्या ठिकाणाहून तक्रारी येत आहेत. उत्तरप्रदेशच्या कैरानामध्येसुध्दा ३०० मतदान केंद्रावर मतदान होऊ शकले नाही. भंडाराच्या २५ टक्के मतदान केंद्रांवर लोकांना मतदान करता आले नाही. पालघरमध्येसुध्दा तीच परिस्थिती आहे. या सरकारचे नेमके चाललेय काय? असा संतप्त सवाल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला.

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले होते की साम दाम दंड भेद वापरुन ईव्हीएम मशीनच्या सहकार्याने निवडणूक जिंकू. आजच्या पोटनिवडणुकांसाठी सुरतहून मशीन आणण्यात आल्या आहेत असा आरोपही त्यांनी केला. मलिक म्हणाले की ज्यावेळी आम्ही यावर प्रश्न उपस्थित केला की डिसप्लेच्यावेळी मशीनवर मतदान करताना ते मत भाजपला जात होते, तेव्हा सांगण्यात आले की तांत्रिक बिघाड आहे. दुरुस्ती केली जाईल. काही मतदान केंद्रांबाहेर मतदार मतदान करण्यासाठी ताटकळत होते. काही ठिकाणी दोन-दोन तास मशीन सुरु होत नसल्याचे चित्र होते.

जिथे भाजपला मतदान मिळत नाही, तिथे पाच-पाच तास मतदान प्रक्रिया थांबवली जात आहे. मतदानापासून वंचित ठेवले जात आहे. भाजप नियोजनबद्ध पद्धतीने मशीनचा वापर करत निवडणूक आपल्याकडे घेण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे ज्याठिकाणी मतदान करण्यास अडथळा आला आहे त्याठिकाणी किमान बॅलेट पेपरने मतदान करण्यास परवानगी द्यावी अशी मागणीही नवाब मलिक यांनी केली. देशात ईव्हीएमवर प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहे. लोकशाहीमध्ये मतदार याबाबत शंका घेत असेल तर निवडणूक आयोगाने यावर निर्णय घ्यावा अशी मागणीही नवाब मलिक यांनी केली. 

संबंधित लेख