इंधन दरवाढी विरोधात राष्ट्रवादीचे आंदोलन, अंबड येथे काढला सायकल मोर्चा

29 May 2018 , 09:04:01 PM

जालना येथील अंबड तालुक्यात इंधन दरवाढी विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने सायकल मोर्चा काढण्यात आला. सरकारने पेट्रोल व डिझेलचे भाव कमी करुन सामान्य जनतेला दिलासा द्यावा अन्यथा पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा आमदार राजेश टोपे यांनी या मोर्चाला संबोधित करताना दिला.

पुढे बोलताना ते म्हणाले की, गेली चार वर्षे केवळ पोकळ घोषणा व खोट्या जाहिराती करण्यातच युती सरकार अग्रेसर आहे. देशातील जनता प्रचंड वाढलेल्या महागाईत होरपळून जात आहे. सर्वसामान्यांना जगणे कठीण झाले आहे. सर्वसामान्य जनतेच्या वेदना समजून घ्यायला केंद्र व राज्य सरकारकडे वेळ नाही. सततच्या इंधन दरवाढीमुळे सर्व क्षेत्रातील व्यवसायांवर विपरीत परिणाम झाला असून विशेषतः शेती उद्योगात शेती मशागतीसाठी खूप मोठ्या प्रमाणावर खर्च वाढला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आर्थिक अडचणीमध्ये भर पडली असल्याचे टोपे यांनी सांगितले. 
 
पेट्रोल व डिझेल दरवाढीमुळे फळे-भाजीपाला, दुध यांचा वाहतूक खर्च वाढल्यामुळे सर्वसामान्य जनतेला आर्थिक संकट सोसावे लागत आहे, तसेच महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाला खूप मोठा आर्थिक फटका बसत असल्याने परिवहन महामंडळ देखील प्रवासी भाडे वाढविण्याचे संकेत देत आहे. यामुळे सर्वसामान्य जनतेला प्रवास करताना आर्थिक अडचण भेडसावणार असल्याची भीतीही टोपे यांनी व्यक्त केली.

संबंधित लेख