राविकाँ जिल्हाध्यक्ष गजानन लोखंडे यांच्याविरोधात खोटा गुन्हा राजकीय दबावापोटी

29 May 2018 , 09:53:33 PM

जाफराबाद तालुक्यातील आदर्श गाव खासगावचे ग्रामविकास अधिकारी सदाशिव लहाने यांनी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष गजानन लोखंडे यांच्याविरोधात अनधिकृत नळ कनेक्शनच्या कारणावरून पोलिसात गुन्हा दाखल केला होता. सदर गुन्हा हा राजकीय दबावापोटी दाखल केला असून ग्रामविकास अधिकारी लहाने यांची चौकशी करून त्यांना निलंबित करण्यात यावे, अशी मागणी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसने केली आहे. राविकाँच्या कार्यकर्त्यांनी गटविकास अधिकारी रमेश काळे यांना घेराव घालून सोमवारी चार तास ठिय्या आंदोलन केले. यावेळी ग्रामविकास अधिकारी लहानेंच्या भ्रष्ट कारभाराचे अनेक नमुने गट विकास अधिकारी यांच्यापुढे मांडण्यात आले.

माझ्या नावावर कोणतीही जागा नाही. नळ कनेक्शन मिळावे यासाठी माझ्या आजोबांनी अर्ज केला होता. हा गुन्हा माझ्यावर राजकीय द्वेषापोटी नोंदविण्यात आला आहे. ग्रामपंचायतमधील भ्रष्टाचाराला वाचा फोडण्याचे काम मी करत असल्याने दबावापोटी मला लक्ष्य केले जात असल्याचे वक्तव्य गजानन लोखंडे यांनी केले.

या आंदोलनासाठी राष्ट्रवादीचे नेते सुधाकर दानवे, तालुका अध्यक्ष राजेश चव्हाण रामधन कळंबे, दत्तु पंडित, प्रभाकर अवकाळे, दिपक वाकडे, उपनगराध्यक्ष अहमद शेख, शहराध्यक्ष कौसर शेख, राष्ट्रवादी युवक अध्यक्ष राजेश म्हस्के आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.

संबंधित लेख