पंतप्रधान मोदी चाचा नेहरूंची जागा घेऊ शकत नाहीत – नवाब मलिक

30 May 2018 , 06:25:27 PM

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रतिमा बनविण्यासाठी जाहिरातींवर सुमारे ४१०० कोटी रुपये उधळण्यात आले. परंतु त्यातून ना मोदींची प्रतिमा बनली, ना लोकप्रियता वाढली. त्यामुळे आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चाचा चौधरी कॉमिकच्या माध्यमातून आपली लोकप्रियता वाढवण्याचा प्रयत्न सुरु केला असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाबव मलिक यांनी केला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने मांडलेल्या योजनांचा प्रचार 'चाचा चौधरी आणि मोदी' या पुस्तकाच्या माध्यमातून केला जात आहे. सर्वशिक्षा अभियानाच्या अंतर्गत अवांतर वाचनासाठी देशभरातील जिल्हा परिषदांना पुस्तके येतात. त्यात २०१७-१८ साली चाचा चौधरी आणि मोदी असे चित्ररूपी पुस्तकही देण्यात आले होते, त्यावर नवाब मलिक यांनी टीका केली आहे.

चाचा चौधरी पुस्तकाच्या माध्यमातून मुलांना शिक्षण देण्याचे काम सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून सुरू झाले आहे. चाचा चौधरी पुस्तकाच्या माध्यमातून लहान मुलांमध्ये लोकप्रियता मिळवण्याचा मोदींनी कितीही प्रयत्न केला तरी ते चाचा नेहरु यांची जागा घेऊ शकत नाहीत असा टोलाही नवाब मलिक यांनी लगावला आहे.

संबंधित लेख