पेट्रोल-डिझेलच्या दरात एका पैशाने घट करून सरकार जनतेला भीक देत आहे का? – नवाब मलिक

30 May 2018 , 08:29:46 PM

पेट्रोल आणि डिझेलच्या दरात बुधवारी एक पैशांची घट झाली आहे. एक पैसा दर कमी करून सरकार जनतेला भीक देत आहे का?  असा संतप्त सवाल पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष आणि मुख्य प्रवक्ते नवाब मलिक नवाब मलिक यांनी केला. पेट्रोल-डिझेलच्या सातत्याने होत असलेल्या दरवाढीच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे पांजरापोळ सर्कल, चेंबूर येथे नवाब मलिक यांच्या नेतृत्वाखाली भव्य आंदोलन करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. युपीए सरकार असताना आम्ही जनतेला दिलासा दिला होता. मात्र या सरकारने जनतेला हैराण करायचे ठरवले आहे. आता जनता शांत बसणार नाही. जोपर्यत पेट्रोल-डिझेलचे दर कमी होत नाही तोपर्यंत हे आंदोलन थांबणार नाही, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

या मोर्चादरम्यान कार्यकर्त्यांनी पेट्रोल पंपावर साखर वाटून आगळ्यावेगळ्या पद्धतीने सरकारचा निषेध केला. पेट्रोल दरवाढीच्या विरोधात ‘कुछ मिठा हो जाये’ म्हणत त्यांनी सरकारवर उपरोधात्मक टीका केली. पेट्रोल आणि डिझेलचे भाव वाढल्यामुळे दुचाकीचा काही उपयोग राहिला नसल्याचे सांगत यावेळी कार्यकर्त्यांनी दुचाकीची प्रेतयात्रादेखील काढली, तसेच वाहनांची शोकसभाही भरवली.

कर्नाटक निवडणुकीनंतर इंधनाचे दर प्रचंड प्रमाणात वाढले आहेत. जगात क्रूड ऑइलचे दर वाढले आहेत त्यामुळे देशातही पेट्रोल-डिझेलचे दर वाढले असल्याचे स्पष्टीकरण सरकारकडून दिले जात आहे. सरकार देशातील जनतेची दिशाभूल करत आहे. खरंतर सरकारकडून पेट्रोल-डिझेलच्या माध्यमातून भरमसाठ कर आकारला जात आहे. त्यामुळेच ही भाववाढ झाली आहे अशी टीका नवाब मलिक यांनी केली. पेट्रोल आणि डिझेलला जीएसटीच्या कक्षेत आणून सरकार जनतेला दिलासा देऊ शकते. केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान पेट्रोल-डिझेलला जीएसटीच्या कक्षात आणू असे आश्वासन देतात मात्र ठोस तसा निर्णय घेतला जात नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आमच्या हातात काही नाही म्हणत निर्णय घेणे टाळतात. जीएसटी काऊंसिलमध्येही त्यांचे बहुमत आहे तरी हा निर्णय का घेतला जात नाही? असा प्रश्न नवाब मलिक यांनी उपस्थित केला.

या आंदोलनाला मुंबई राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष निलेश भोसले, राष्ट्रवादी मुंबई सचिव मधुकर शिरसाट, सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष विष्णू गायकवाड, अल्पसंख्याकचे तालुका अध्यक्ष नजीर मुल्ला, युवक जिल्हाध्यक्ष सुनील गिरी आणि असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

संबंधित लेख