राज्यातील शेवटच्या शेतकऱ्याचा हरभरा खरेदी होईपर्यंत खरेदी केंद्रे सुरू ठेवा - धनंजय मुंडे

30 May 2018 , 10:28:12 PM

राज्यातील हजारो शेतकऱ्यांचा लाखो क्विंटल हरभरा खरेदी अभावी नोंदणी करूनही पडून आहे. त्यामुळे राज्यातील शेवटच्या शेतकऱ्याचा हरभरा खरेदी होईपर्यंत खरेदी केंद्रे सुरू ठेवावीत, अशी मागणी विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्र्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन केली. मागील दोन ते तीन महिन्यापासून केंद्रं सुरू असूनही हरभरा खरेदी सुरू नव्हती, हरभऱ्याला बारदानाही उपलब्ध नव्हता, त्यामुळे शेतकऱ्यांच्या हरभऱ्याची खरेदी झाली नाही. हजारो शेतकऱ्यांनी हरभरा खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणी केली होती, मात्र शेतकऱ्यांच्या हरभऱ्याची खरेदी झाली नाही अशी माहिती धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्र्यांना दिली.

खरेदी केंद्राच्या आवारात लाखो क्विंटल हरभरा पडून आहे, पावसाळा तोंडावर आहे त्यामुळे हरभऱ्याचे नुकसान होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत तातडीने खरेदी केंद्रे पुन्हा सुरू करण्यात यावीत, अशी मागणी मुंडे यांनी केली. बाजारात हरभऱ्याला कमी भाव आहे अशात शेतकऱ्यांना खरेदी केंद्रांशिवाय पर्याय नाही, शेतकरी हवालदिल झाला आहे, त्यामुळे त्याला तात्काळ मदत करावी असेही ते म्हणाले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धनंजय मुंडे यांच्या या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत आम्ही याबाबतीत केंद्राला प्रस्ताव पाठवला असल्याचे सांगितले. यावेळी धनंजय मुंडे यांच्यासह आमदार जयवंत जाधव, आंबाजोगाई कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती गोविंद देशमुख उपस्थित होते.

संबंधित लेख