लोकसभा पोटनिवडणुकीच्या निकालांनी भाजपच्या अकार्यक्षमतेवर शिक्कामोर्तब - नवाब मलिक

07 Jun 2018 , 07:38:48 PM

मुंबई येथील प्रदेश कार्यालयात मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी लोकसभा पोटनिवडणुक निकालाच्या पार्श्वभूमीवर पत्रकारांसोबत संवाद साधला. भंडारा-गोंदिया मध्ये झालेला राष्ट्रवादी काँग्रेसचा विजयही यावेळी साजरा करण्यात आला. पत्रकार परिषद सुरू करण्यापूर्वी महाराष्ट्राच्या राजकीय व सामाजिक क्षेत्रात भरीव कामगिरी करणारे राज्याचे कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांना श्रद्धांजली वाहिली. त्यांच्या जाण्याने महाराष्ट्राच्या राजकारणात पोकळी निर्माण झाली असल्याचे भावनिक वक्तव्य त्यांनी केले.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मधुकर कुकडे यांना भंडारा-गोंदिया मतदारसंघात विजयी करून जनतेने माजी खासदार नाना पटोले यांच्या राजीनाम्यावर शिक्कामोर्तब केला असल्याचे वक्तव्य नवाब मलिक यांनी करत जनतेचे आभार मानले. भंडारा-गोंदिया मतदारसंघात नाना पटोले यांनी सरकार जनतेच्या, शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेत नाही, लोकप्रतिनिधींना आपले मत मांडण्याचा अधिकार देत नाही यास कंटाळून राजीनामा दिला होता. देशात झालेल्या चार लोकसभा तर दहा विधानसभा पोटनिवडणुकींचा निकाल आज जाहीर झाला. पालघर वगळता तीन जागेवर भाजपला पराभव स्वीकारावा लागला आहे. भाजपला त्यांच्या स्वतःच्या जागाही जिंकता आल्या नाहीत, असे मलिक यांनी नमूद केले.

पालघरमध्ये मत विभाजनाचा फायदा भाजपला झाला. मतांचे विभाजन झाले नसते तर भाजपला ही जागाही जिंकता आली नसती असे मत नवाब मलिक यांनी व्यक्त केले. बहुजन विकास आघाडीला काँग्रेसने पाठिंबा द्यावा अशी राष्ट्रवादीची भूमिका होती. असे झाले असते तर भाजपला पालघरही जिंकता आले नसते असे नवाब मलिक म्हणाले. भाजपने सत्तेचा दुरुपयोग करत, अफाट पैसा खर्च करत, सरकारी यंत्रणेचा वापर करत ही निवडणूक जिंकली. साम-दाम-दंड-भेदाचा वापर या निवडणुकीत भाजपने केला असा आरोप त्यांनी केला.

भंडारा-गोंदियातही भाजपने तसा प्रयत्न केला असल्याचे ते म्हणाले. भाजपने आचारसंहितेचा भंग करत शेतकऱ्यांना प्रलोभने दाखवण्याचा प्रयत्न केला. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्यांनी तो प्रयत्न हाणून पाडला आणि निवडणूक आयोगाला तक्रार केली. अनेक इव्हीएम मशीनमध्ये घोळ झाला होता. त्यामुळे ४९ ठिकाणी फेरमतदानही घेण्यात आले होते. पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही. सत्तेत राहण्यासाठी नियत चांगली असावी लागते असे मत त्यांनी मलिक यांनी व्यक्त केले. भाजपची नियत चांगली नाही म्हणून इव्हीएमचा दुरुपयोग केला जात आहे. या निवडणुकीतही प्रचंड घोळ झाला होता. इव्हीएम मशीनबाबत लोकांना शंका असल्याचे ते म्हणाले. अनेक विकसनशील देशात आजही बॅलेट पेपरवर निवडणुका होतात. निवडणूक आयोगाने याचा विचार करायला हवा असे ते म्हणाले.

येऊ घातलेल्या लोकसभा व विधानसभा निवडणुकांसाठी शिवसेना आणि भाजप जरी एकत्रित लढले तरी राष्ट्रवादी, काँग्रेस, शेकाप आणि इतर समविचारी पक्ष एकत्र येऊन २०१९ च्या निवडणुकांमध्ये भाजपला सत्तेतून खाली खेचू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

संबंधित लेख