निष्क्रिय युवक शहर व जिल्हाध्यक्षांना १५ दिवसात बदलणार - जयंत पाटील

07 Jun 2018 , 11:38:45 PM

मुंबई प्रदेश कार्यालयात मंगळवार, ५ जून रोजी युवक प्रदेश पदाधिकारी बैठक पार पडली. या बैठकीत विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी युवकांना मार्गदर्शन केले. युवक पदाधिकाऱ्यांनी आपली जबाबदारी योग्यरित्या पार पाडली तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सर्वात मोठा पक्ष ठरेल असा विश्वास त्यांनी युवकांना दिला.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी येत्या काळात बुथ कमिटीवर जास्त भर देणार आहे. युवक पदाधिकाऱ्यांनी बुथ कमिट्या पूर्ण होण्यासाठी पाठपुरावा करावा असा सल्ला त्यांनी दिला. त्यासाठी एक अॅप तयार केले आहे, त्याचे अनावरण मा. शरद पवार साहेबांच्या हस्ते १० जून रोजी पक्षाच्या वर्धापनदिनी होईल अशी माहिती त्यांनी दिली. या अॅपमध्ये बुथ लेवलची कामे, अध्यक्षांशी थेट संवाद असे विविध पर्याय असतील. युवक पदाधिकाऱ्यांनी कामाचा फ्लो तयार करून त्याचा वारंवार आढावा घेत राहावा असे मत त्यांनी व्यक्त केले. २०१९ ची विधानसभा जिंकायची असेल तर आपल्याला नेटवर्क निर्माण करावे लागेल असे सांगतानाच काम करणाऱ्यांना संधी देण्याचा आग्रह त्यांनी धरला.

तरुण म्हणजे सळसळते रक्त, आक्रमकता, समस्यांवर मात करणे. तरुण कार्यकर्त्यांनी आपल्या समस्यांवर मात करावी अशी अपेक्षा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी व्यक्त केली. युवकांच्या सलग दुसऱ्या बैठकीलाही प्रदेशाध्यक्ष उपस्थित आहेत. यातून स्पष्ट होते की, राष्ट्रवादी युवक काँग्रेसची भूमिका पक्षासाठी किती महत्वाची आहे. युवकांसाठी काही निर्वाणीचे निर्णय घेण्याची विनंती मुंडे यांनी प्रदेशाध्यक्षांना केली. २०१४ ला युवकांमुळेच सत्ता परिवर्तन झाले. आज तोच युवक भाजपला कंटाळून गेला आहे. सोशल मीडियावरही ट्रेंड बदलला आहे. त्यामुळेच आता परिवर्तन घडणार आणि या परिवर्तनाच्या लढाईत राष्ट्रवादी युवकांचा वाटा सिंहाचा असेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. राष्ट्रवादी युवक काँग्रेसने एक बुथ दहा युथ अशी संकल्पना मांडली आहे. त्या संकल्पनेत पंचवीस युवकांचा समावेश करण्याची सूचना त्यांनी केली. सरकारच्या विरोधात टाहो फोडणाऱ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांवर पोलिस बळाचा वापर करत असेल तर समजा सरकारचे दिवस भरले आहेत. पोलिसांच्या दहशतीने दबण्याची गरज नाही म्हणत त्यांनी कार्यकर्त्यांचे मनोबल वाढवले.

निवडणुकांसाठी फक्त एक वर्षाचा कालावधी उरला आहे. युवक कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागावे. कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावर जास्त भर द्यावा. सरकारची चुकीची धोरणे तरुणांनी जनतेसमोर मांडावीत असा सल्ला राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते पाटील यांनी दिला. राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना पोलिसांकडून त्रास दिला जात आहे, मारहाण केली जात आहे, गुन्हे दाखल केले जात आहे. तरी युवक कार्यकर्ता या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून काम करत आहे अशा शब्दांत कोते पाटील यांनी युवकांना प्रोत्साहन दिले.

राष्ट्रवादीचे मुंबई युवक अध्यक्ष निलेश भोसले यांनी यावेळी संग्राम कोते पाटील यांच्या प्रयत्नांमुळे राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रकाशात आली असल्याचे म्हटले. येत्या काळात मुंबई राष्ट्रवादी युवक काँग्रेस एक काडर बेस संघटना म्हणून काम करेल. जिथे कमी पडलो तो बॅकलॉग भरून काढू, अशी ग्वाही त्यांनी दिली.
या बैठकीदरम्यान माजी आमदार संदीप बाजोरिया, आमदार राहुल जगताप, आमदार वैभव पिचड, आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.

संबंधित लेख