'सरकार हटाव, शेतकरी बचाव' राष्ट्रवादी किसान मंचचे अभियान

08 Jun 2018 , 06:47:26 PM

राज्यातील आणि केंद्रातील भाजप सरकार हे शेतकरी विरोधी आहे. शेतीमालाला भाव मिळावा या मागणीसाठी शेतकरी रस्त्यावर उतरले, तरीदेखील सरकारने शेतकऱ्यांचे आंदोलन बेदखल केले आहे. आंदोलनाची तीव्रता कमी करण्याचा सरकारकडून प्रयत्न सुरु आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा या सरकारवरील विश्वास उडाला आहे. ‘शेतकरी विरोधी सरकार हटाव, शेतकरी बचाव’, हा नारा देत येत्या निवडणुकीत भाजप सरकारला गाडल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही, असा निर्धार राष्ट्रवादी किसान सभेचे प्रदेशाध्यक्ष माजी आमदार शंकरराव धोंडगे यांनी व्यक्त केला आहे.

किसान मंच या शेतकरी संघटनेच्या पश्चिम महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांची बैठक गुरूवारी येथील शासकीय विश्रामगृह येथे पार पडली. बैठकीला मार्गदर्शन करण्यासाठी धोंडगे आले होते. बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणावर टीका केली.

शेतीमालाला हमीभाव मिळावा ही शेतकऱ्यांची गेल्या अनेक वर्षापासूनची मागणी आहे. परंतु सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे गांभीर्याने पाहात नाही. मागील सहा दिवसांपासून शेतकरी संपावर गेले आहेत. तरीही निगरगट्ट सरकारला पाझर फुटत नाही. भाजप सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांच्या निषेधार्थ राष्ट्रवादी किसान सभा आणि किसान मंचच्या माध्यमातून राज्यभरात आंदोलने करुन आवाज उठवला जाणार आहे. याची सुरवात येत्या ९ ऑगस्ट रोजी क्रांती दिनीपासून सेवाग्राम येथून केली जाणार आहे. त्यानंतर सलग सहा महिने राज्यभरात सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांविषयी शेतकऱ्यांमध्ये जनजागृती केली जाणार असल्याचेही धोंडगे यांनी सांगितले. बैठकीस किसन मंचचे जिल्हा निमंत्रक सिद्धेश्वर हेंबाडे, राष्ट्रवादी किसन सभेचे जिल्हाध्यक्ष मारुती जाधव, शंकर गोडसे, रुपेश अंबुरे, राजेंद्र भोसले,पंजाब भोसले, बाळासाहेब पांडे, ज्ञानेश्वर जाधव, लक्ष्मण पवार, शिवाजी कोळेकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

एफआरपीची रक्कम मिळावी यासाठी उच्च न्यायालयात धाव घेणार
पंढरपूर व परिसरातील काही साखर कारखान्यांनी गाळप हंगाम संपून तीन महिने उलटून गेले तरी अद्याप एफआरपीची रक्कम शेतकऱ्यांना दिली नाही, याविषयी बैठकीत चर्चा झाली. ज्या साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांची रक्कम थकवली आहे त्या कारखान्यांच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात लवकरच खटला दाखल केला जाणार आहे, अशी माहिती शेतकरी संघटनेचे सातारा जिल्हा अध्यक्ष शंकर गोडसे यांनी सांगितले.

संबंधित लेख