शिवसेना त्यांच्या मंत्र्याकडे असलेल्या एसटीतील संपकरी कर्मचाऱ्यांच्या पाठीशी उभी राहणार का? - धनंजय मुंडे

11 Jun 2018 , 10:50:39 PM

पगारवाढीसह अन्य मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी ८ जूनच्या मध्यरात्रीपासून संप पुकारला आहे. त्याचप्रमाणे एसटीचे दरही वाढवले आहेत. सत्तेत राहून सरकारवर सातत्याने टीका करणाऱ्या शिवसेनेला त्यांच्या मंत्र्याकडे असलेल्या विभागाने केलेली ही दरवाढ मान्य आहे का? अंगणवाडी कर्मचारी संघटनेने केलेल्या संपावेळी त्यांना साथ देणारी शिवसेना आणि उद्धव ठाकरे आता एसटी कर्मचाऱ्यांच्या बाजूने ठाम उभे राहतील का? असा प्रश्न विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला.

राज्यात एकूण १७ हजार एसटी असून दररोज ७० लाख प्रवासी एसटीने प्रवास करतात. हा कुठल्याही अधिकृत संघटनेने पुकारलेला संप नसून कर्मचाऱ्यांनी तो उत्स्फुर्तपणे पुकारला आहे. भंडारा, सांगली, औरंगाबाद, मुंबई, पुणे येथे मध्यरात्रीपासून कर्मचारी संपावर गेले आहेत. त्यामुळे राज्यात अनेक स्थानकांत बसेस उभ्या आहेत. राज्यातील अनेक भागात एसटी सेवा सुरळीत सुरु असली तरी काही संघटनांच्या दाव्यानुसार या संपाचे परिणाम मोठ्या प्रमाणावर झालेले दिसत आहेत.

राज्यात सुरू असलेल्या एस. टी. कर्मचा-यांच्या संपाबाबत, कर्मचाऱ्यांच्या न्याय मागण्यांबाबत सरकारने तातडीने तोडगा काढला पाहिजे. तसेच अन्यायकारक दरवाढ मागे घेऊन जनतेला दिलासा दिला पाहिजे. एसटीच्या दरवाढीमुळे व कर्मचा-यांच्या संपामुळे सामान्य जनतेचे हाल होत आहे. एकीकडे कर्मचा-यांना पगारवाढ दिल्याचे कारण पुढे करून तिकिटांची दरवाढ करायची, दुसरीकडे कर्मचाऱ्यांनाही समाधानकारक पगारवाढ द्यायची नाही. एस. टी. कर्मचारी आणि जनता या दोघांचीही फसवणूक कराण्याचा सरकारचा दुहेर डाव आहे, असे मत विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांनी मांडले.

संबंधित लेख