मुंबईकरांना पूर्णवेळ चीफ फायर ऑफिसर मिळणार का? - पत्रकार परिषदेत नवाब मलिक यांचा रोखठोक सवाल

15 Jun 2018 , 12:46:51 AM

मुंबईतील प्रभादेवी येथील ‘ब्यु माँड’ इमारतीला बुधवारी लागलेल्या आगीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी सरकारच्या नियोजनशून्यतेवर ताशेरे ओढले. मुंबई शहरात अशा आगीच्या घटना सातत्याने घडत आहेत. याआधीही साकीनाका, कमला मिल येथे आग लागली होती. त्यावेळी अनेक लोकांनी आपला जीव गमावला होता. असे असतानाही आगप्रतिबंधासाठी कोणतेही नियोजन केले गेले नसल्याचे स्पष्ट होत असून आगीच्या दुर्घटनांबाबत महापालिका आणि राज्य प्रशासन गंभीर नाही, असा आरोप मलिक यांनी आज राष्ट्रवादी भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत केला. या आगींच्या घटनांमुळे अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत. कमला मिल येथे लागलेल्या आगीच्या वेळी खासगी लोकांना ऑडिट करण्यासाठी नेमा अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने घेतली होती. सरकारने नेमणूक केली पण त्यांना अनेक अटी घातल्या गेल्या. मुंबईचा कारभार रामभरोसे सुरू आहे. त्यामुळे, लोकांचा जीव गेला तरी चालेल पण सत्ताधाऱ्यांचा गल्ला भरला पाहिजे अशी सरकारची भूमिका असल्याची टीका मलिक यांनी केली. मुंबईतील मुख्य अग्निशमन अधिकाऱ्यांवर अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला आहे. पण एकच अधिकारी दोन ठिकाणी कसे लक्ष देऊ शकतो? पूर्ण वेळ अधिकाऱ्याची नेमणूक का होत नाही? कॅपिटेशन फीच्या माध्यमातून प्रत्येक वर्षी ७०० कोटी जमवले जातात मग हे ७०० कोटी जातात कुठे? असे प्रश्न उपस्थित करत सरकारने वेळीच जागे होऊन पूर्णवेळ मुख्य अग्निशमन अधिकारी मुंबईसाठी नेमावा अशी मागणीही त्यांनी केली.

यावेळी पत्रकार परिषदेत राज्यातील इतर घडामोडींवरही मलिक यांनी भाष्य केले. राज्य सरकारने आणीबाणीच्या काळात अटक झालेल्या व्यक्तींना पेन्शन सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय होत असताना शिवसेनेची भूमिका काय होती हे स्पष्ट करावे, असे आव्हान त्यांनी सेनेला केले. बाळासाहेब ठाकरे यांनी आणीबाणीचे समर्थन केले होते त्यामुळे सरकारच्या या भूमिकेला शिवसेनेचे समर्थन आहे का? समर्थन असल्यास शिवसेना बाळासाहेबांना चुकीचे ठरवत आहे का? असा सवाल त्यांनी केला. तसेच सरकार मिसा कायद्यांतर्गत अटक झालेल्या सर्वांना पेन्शन देणार का? मग या कायद्याअंतर्गत अटक झालेले हाजी मस्तान सारखे स्मगलर्सदेखील सरकारलेखी स्वातंत्रसेनानी आहेत का, अशी खरमरीत टीका मलिक यांनी केली. स्वातंत्र चळवळीत आरएसएसचा कुठेही सहभाग नव्हता. आणीबाणीच्या काळातील लोकांना पेन्शन देऊन हे सरकार आरएसएसनेही या देशासाठी योगदान दिले असल्याचे चित्र निर्णाण करत आहे. हे म्हणजे ‘उंगली कटाके शहीदो मे नाम लिखाना’, असे सरकारचे धोरण आहे.

काही दिवसांपूर्वी डाव्या चळवळीतील सुधीर ढवळेंसह काही कार्यकर्त्यांना गोवंडीमधून अटक करण्यात आली. लोकांनी याविरोधात आंदोलन केले असता पोलिसांनी या कार्यकर्त्यांना लपवून पुण्यात नेले. पोलिसांनी अटक केलेल्या कार्यकर्त्यांना त्याच दिवशी कोर्टात हजर करणे गरजेचे होते. पण पोलिसांनी तसे का केले नाही? तसेच पोलिसांनी या कार्यकर्त्यांच्या रिमांडसाठी एक पत्र कोर्टात सादर केले. या पत्राच्या माध्यमातून अनेक प्रश्न निर्माण होत आहेत; कोर्टात सादर केलेले पत्र तासाभरात प्रसिद्धी माध्यमांपर्यंत कसे पोहोचले? पोलिसांनीच हे पत्र वाहिन्यांना पुरवले का? असे संवेदनशील पत्र बाहेर जाणे हा सरकारचा हलगर्जीपणा असल्याचा आरोप नवाब मलिक यांनी केलाय. तसेच या पत्राच्या खरेपणाबाबतही त्यांनी शंका उपस्थित केली. कॉम्रेड आपल्या लेखनात लाल सलाम व्यतिरिक्त कोणताच उल्लेख करत नसताना या पत्रात इंग्रजीत रेड सॅल्यूट असा उल्लेख आलेला आहे, डाव्या संघटनेचे कार्यकर्ते कधीही खऱ्या नावाचा उल्लेख करत नसताना या पत्रात थेट प्रकाश असे नाव घेतले आहे. हे पत्र पाहिल्यानंतर सरकारचा फर्जीपणा स्पष्ट दिसून येत आहे. मुख्यमंत्र्यांवर आरोप आहे की ते कागदपत्रांची हेराफेरी करतात. नागपुरात अशा प्रकारच्या केसेस मुख्यमंत्र्यांवर आहे. बनावट कागदपत्र सादर करण्यात मुख्यमंत्री माहीर आहेत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणातही फर्जीपणा केला असेल अशी शंका घेण्यास वाव असल्याचा टोला त्यांनी लगावला.

संभाजी भिडे यांच्या वादग्रस्त विधानावर बोलताना, अंधश्रद्धा निर्मूलन कायद्यांतर्गत याप्रकरणी गुन्हा दाखल व्हायला हवा होता, पण संभाजी भिडे हे पंतप्रधान मोदी यांचे गुरु असल्याने त्यांच्यावर कोणतीही कारवाई होणार नाही, त्यांना भीमा-कोरेगाव सारख्या गंभीर प्रकरणातही क्लीन चिट देण्यात आली, असे वक्तव्य मलिक यांनी केले.

दरम्यान, येत्या २३-२४ जून रोजी होणारे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय संमेलन पुढे ढकलण्यात आले असून राष्ट्रीय संमेलनाची नवी तारीख आणि जागा लवकरच ठरवली जाईल, तसेच प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज २४ ठिकाणच्या जिल्हाध्यक्षांची निवड जाहीर केली असून उर्वरित कार्यकारिणीदेखील लवकरच जाहीर केली जाईल, अशी माहितीही मलिक यांनी पत्रकार परिषदेत दिली.

संबंधित लेख