राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने राखला शब्द; पक्षाकडून फुलमाळी कुटुंबियांना मदतीचा हात

18 Jun 2018 , 07:14:55 PM

औषध फवारणीदरम्यान विषबाधा होऊन यवतमाळ जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांचा मृत्यू झाला होता. या मृत शेतकऱ्यांपैकी गजानन फुलमाळी यांच्या कुटुंबाची जबाबदारी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने यवतमाळ येथील हल्लाबोल आंदोलन सभेच्यादरम्यान घेतली होती. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने दिलेला शब्द पाळत फुलमाळी कुटुंबियांना पीठाची गिरणी देत रोजगार उपलब्ध करून दिला आहे.

यवतमाळ येथील सावरगावमध्ये औषध फवारणीच्या वेळी विषबाधेने मृत्यू पावलेले शेतकरी गजानन फुलमाळी यांची कन्या प्रतिक्षा फुलमाळी हिने वडिलांचा मृत्यू कसा झाला हे जाहीर सभेत सांगितले होते. हे सांगताना तिला अश्रू अनावर झाले होते. त्यावेळी खासदार सुप्रिया सुळे यांनी तिच्याजवळ जात तिला धीर देत फुलमाळी कुटुंबाची जबाबदारी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी घेणार असल्याचे आश्वासन दिले होते. यानंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी वेळोवेळी फुलमाळी कुटुंबियांशी संपर्क साधला. प्रतिक्षा फुलमाळी हिने सुळे यांच्याकडे आईच्या रोजगारासाठी शिलाई मशीनची मागणी केली होती, मात्र सुप्रिया सुळे यांनी थेट पिठाची गिरणी देत फुलमाळी कुटुंबाची मदत केली आहे.

ही भेट देत असताना माजी आमदार संदीप बाजोरिया, जिल्हाध्यक्ष नानाभाऊ गाडबैले, महिला जिल्हाध्यक्षा क्रांती धोटे, युवती जिल्हाध्यक्षा मनीषा काटे आणि इतर प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.

संबंधित लेख