मागासवर्गीय विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा सरकारचा डाव – ईश्वर बाळबुधे

20 Jun 2018 , 06:40:18 PM

राज्य सरकारने अनुसूचित जात-जमाती, ओबीसी आणि व्हिजेएनटी प्रवर्गातून महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक केले आहे. जात वैधता प्रमाणपत्राशिवाय विद्यार्थ्यांना महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेता येणार नाही. सरकारचा हा निर्णय म्हणजे मागासवर्गीय विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा डाव आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ओबीसी सेलच्या प्रदेशाध्यक्ष ईश्वार बाळबुधे यांनी केली आहे. सरकारच्या या निर्णयाविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या ओबीसी सेलच्या वतीने नागपूर येथे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या ओबीसी सेलच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी आणि सामाजिक न्याय विभागाच्या उपायुक्तांना घेराव घालण्यात आला. ओबीसी सेलच्या कार्यकर्त्यांनी यावेळी जिल्हाधिकारी आणि सामाजिक न्याय विभागाच्या उपायुक्तांना निवेदनही दिले. विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्याची तारीख वाढवून मिळावी तसेच विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी घातल्या गेलेल्या जाचक अटी शिथील कराव्यात, अशी मागणी या निवेदनाद्वारे केली गेली आहे. सरकारने या मागण्या मान्य नाही केल्या तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी येत्या हिवाळी अधिवेशनात लाखो विद्यार्थ्यांसह विधान भवनावर धडक देईल असा इशाराही बाळबुधे यांनी दिला.

संबंधित लेख