राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिलाशक्तीने दिला 'संविधान वाचवा, देश वाचवा'चा नारा'

21 Jun 2018 , 06:46:57 PM

आपला देश समता, बंधुत्व, धर्मनिरपेक्षता, न्याय या संविधानिक तत्त्वांना जपत वाटचाल करणारा देश आहे. मात्र आजची देशातील परिस्थिती पाहता या मूलभूत तत्त्वांची पायमल्ली होताना दिसत आहे. म्हणूनच राष्ट्रवादी महिला काँग्रेसतर्फे 'संविधान वाचवा, देश वाचवा' हे अभियान सुरु करण्यात आले आहे. या अभियानांतर्गत आज मुंबईत राष्ट्रवादीच्या महिलाशक्तीने संविधान बचाओचा नारा देत राज्यव्यापी आंदोलनाचा आरंभ केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या महिलाशक्तीकडे प्रतिकात्मक मशाल सुपूर्द केली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व महिला नेत्या, पदाधिकारी आणि दिग्गज नेत्यांनी या आंदोलनात सहभागी होत संविधान वाचवा मोहीम सर्वव्यापी करण्याची हमी दिली.

यावेळी बोलताना खा. सुप्रिया सुळे यांनी ही चळवळ सुरू करण्यासाठी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष फौजिया खान यांचे अभिनंदन केले. कुटुंब असो वा समाज जेव्हा काही संकट समोर उभे ठाकते तेव्हा एक महिलाच खंबीरपणे धैर्याने त्याचा सामना करायला सर्वप्रथम उभी राहते. त्यामुळेच संविधान बचावाचा मुद्दादेखील सर्वात आधी एका महिलेला सुचला आणि त्यासाठी एक मोहीम उभी राहिली याचे मला आश्चर्य वाटत नाही, असे प्रतिपादन सुळे यांनी केले. हे आंदोलन पक्षापुरते मर्यादित न ठेवता त्याला अधिक व्यापक करायचा आपण प्रयत्न करूया. ही एक सरकारविरोधातील ठिणगी आहे. सरकारने वेळीच सावध व्हावे, अन्यथा ही ठिणगी ज्वाला बनून फुटली तर हे सरकार भस्म झाल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही सुळे यांनी यावेळी दिला. संविधान वाचवा म्हणण्याची वेळ आज का यावी याचा आपण विचार करायला हवा. महिलांचे प्रश्न, त्यांच्या समस्या, महिला धोरण याबाबत पक्षस्थापनेपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काम करत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने नेहमीच समतेचा, महिला सबलीकरणाचा पुरस्कार केला आहे, समतेचा हा अधिकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला दिला आहे. त्यामुळे या संविधानाची पायमल्ली करणारी भाषा कोणी बोलत असेल, कृती करत असेल तर त्याविरोधात आवाज उठविण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे, असे वक्तव्य सुप्रिया सुळे यांनी केले. आदरणीय पवार साहेबांनी एक अभिनव निर्णय घेत देशात महिला धोरण राबविले. महिला सबलीकरणासाठी महिला धोरणात सातत्याने सुधारणा आणि बदल व्हायला हवेत हा विचार पवार साहेबांनी दिला आणि म्हणूनच तीन वेळा सुधारित महिला धोरण रावबिणारे हे महाराष्ट्र हे देशातील एकमेव राज्य ठरले. सत्ताबदलानंतर महिला धोरणाकडे कोणीही लक्ष दिलेले नाही. पण हे धोरण आज केवळ आरक्षणापुरता मर्यादित राहिलेले नाही ना? त्याची योग्य अमलबजावणी होतेय की नाही? याचा अभ्यास होणे गरजेचे असल्याचे मतही सुळे यांनी मांडले.

आपल्या देशाच्या संविधान सभेत महिलांचा सहभाग होता, मात्र आज देशाची परिस्थिती तशी नाही. या परिस्थितीत बदल घडविण्यासाठी नवी क्रांती करावी लागेल. म्हणूनच संविधान वाचवा, देश वाचवा हा कार्यक्रम राज्यपातळीवर प्रत्येक जिल्ह्यात, प्रत्येक भागात केला जाईल, अशी माहिती राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष फौजिया खान यांनी दिली. सध्याची स्थिती हे लोकशाहीसाठी घातक आहे, देशातील कायदा-सुव्यवस्था बिघडली आहे. देशाच्या सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश पत्रकार परिषद घेऊन आपली भीती व्यक्त करत आहेत. देशात विविध समाजातील व्यक्तींमध्ये तेढ पसरवली जात आहे, समाजमनात विष पेरले जात आहे. हे आम्हाला मान्य नाही त्यामुळे याविरोधात आम्ही तीव्र लढा देऊ, असे खान यांनी स्पष्ट केले.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ भारताचे स्वातंत्र्य, बंधुता, न्याय, समता ही तत्त्वे धोक्यात आली असून समाजासमाजात तेढ निर्माण करण्याचे काम केले जात असल्याबद्दल खंत व्यक्त केली. आज देश महिलांवरील अत्याचारांसाठी ओळखला जात आहे. देशात हुकूमशाही सुरू आहे. दलितांना मारहाण केली जात आहे, त्यांना नक्षलवादी ठरवले जात आहे. जामनेर इथली घटना हे अत्याचाराचे ठळक उदाहरण आहे. सरकारमध्ये बसलेले लोक स्वतः कबूल करतात की ते संविधान बदलण्यासाठीच सत्तेवर आले आहे, ही परिस्थिती बदलणे गरजेचे असल्याचे वाघ म्हणाल्या. निवडणूक जिंकण्यासाठी साम-दाम-दंड-भेद या सर्व गोष्टींचा वापर करणारे सत्ताधारी या देशासाठी धोकादायक आहे. याला विरोध केला तर आवाज दाबण्याचा प्रयत्न होतो. या सर्व गोष्टींना वेळीच आळा घालणे गरजेचे आहे म्हणून आपण आपला आवाज बुलंद करायला हवा, असेही त्या म्हणाल्या.

देशातील वातावरण गढूळ झाले असून यामागे कोणती विघातक शक्ती आहे त्याचा शोध घेऊन आपण त्यांना धडा शिकवायलाच हवा, असे वक्तव्य खा. 
वंदना चव्हाण यांनी केले. राज्यात बलात्कारांचे प्रमाण वाढत आहे, खुद्द सत्ताधारी भाजपच्या पदाधिकाऱ्यांवरच बलात्काराचे गुन्हे आहेत, ही शोकांतिका असल्याचे त्या म्हणाल्या. देशातील लोकशाही धोक्यात आली आहे. सोशल मीडियावर खालच्या पातळीवर ट्रोलिंग होत आहे. सोशल मीडियावर आपण व्यक्त झालो तर शिव्यांचा भडीमार केला जातो. संसद भवनात कायदे होतात पण चर्चेविनाच कायदे पारीत केले जातात. स्वतः सत्ताधारी पक्षाचे लोक सभागृहात गोंधळ घालतात. जस्टीस लोहीयां यांच्या मृत्यूचे गुढ कायम आहे, असे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. या सगळ्या गोष्टींचा विचार आता व्हायला हवा, आपण गप्प बसून चालणार नाही, आंदोलन अभारावेच लागेल, असे चव्हाण यांनी स्पष्ट केले.

देशात आज मनुवादी संस्कृती आज डोके वर काढू पाहत आहे. या मनुवादी विचारसरणीला जाळून टाकण्यासाठी ही मशाल असल्याचे वक्तव्य आ. विद्या चव्हाण यांनी याबाबत केले. चव्हाण पुढे म्हणाल्या की, “आजची परिस्थिती फार भयंकर झाली आहे. आपले हक्क आज अडचणीत आले आहेत. दाभोळकरांची हत्या झाली कारण त्यांना अंधश्रद्धा निर्मूलन कायदा आणायचा होता. अंधश्रद्धेचा जास्त फटका हा महिलांनाच बसतो म्हणून हा कायदा संपूर्ण देशात लागू करायलाच हवा. सनातन संस्थेच्या माध्यमातून विचारवंतांच्या हत्या केल्या जात आहे म्हणून सनातन संस्थेवर बंदी घालणे गरजेचे आहे अशी आम्ही मागणी करू. तसेच या मेळाव्याला काही महिला झोपडपट्टीतून आल्या आहेत. त्यांनी एक विचार इथून घेऊन जायला हवा. तुमच्या हक्कासाठी बाबासाहेबांनी संविधान बनवले. त्या संविधानाचे रक्षण आपल्याला करायचे आहे. आपण एकजुटीने हे कार्य करू”

या कार्यक्रमास माजी केंद्रीय मंत्री प्रफुल पटेल, विधिमंडळ पक्षनेते अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, राष्ट्रीय सरचिटणीस पीतांबर मास्तर, राष्ट्रीय सरचिटणीस सुनील तटकरे, राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक, माजी मंत्री राजेश टोपे, माजी खासदार पद्मसिंह पाटील, आमदार प्रकाश गजभिये, आमदार ख्वाजा बेग, आमदार रामराव वडकुते, राष्ट्रवादी महिला मुंबई अध्यक्ष सुरेखा पेडणेकर आणि पक्षाचे इतर प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

संबंधित लेख