माथाडी कामगार सत्तापालट करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावणार – जयंत पाटील

29 Jun 2018 , 09:09:31 PM

राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयात माथाडी कामगारांची बैठक घेण्यात आली. बैठकीदरम्यान विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. माथाडी कामगार हे राष्ट्रवादीच्या पाठिशी उभे राहतील असे निवेदन आणि ग्वाही माथाडी कामगार सेलतर्फे यावेळी देण्यात आली.

बैठकीदरम्यान प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी माथाडी कामगारांच्या प्रश्नांबाबत पक्ष नेहमीच पुढाकर घेतो असे सांगितले. शरद पवार साहेबांनी नेहमीच माथाडी कामगारांना महत्त्व दिले. जेव्हा नवी मुंबई शहराची स्थापना झाली तेव्हा माथाडी कामगारांसाठी विशिष्ट जागा मिळावी, असा विचार पवार साहेबांनी मांडला आणि त्याची अमलबजावणीही करण्यात आली असल्याचे जयंत पाटील म्हणाले. माथाडी कामगारही राष्ट्रवादी आणि पवार साहेबांच्या पाठिशी नेहमी ठामपणे उभा राहिला अशा भावना त्यांनी व्यक्त केली.

माथाडी कामगार इतका महत्त्वाचा आहे की कोणत्याही पक्षाच्या मुख्यमंत्र्यांना त्याच्या व्यासपीठावर यावंच लागतं. माथाडी कामगार सत्तापालट करण्यात महत्त्वाची भूमिका बजावतो असे मत जयंत पाटील यांनी व्यक्त केले. चार वर्षांपासून राज्यात, देशात भाजपचे सरकार आहे. माथाडी कामगारांच्या प्रश्नांकडे सरकारला दुर्लक्ष करता येणार नाही एवढी ताकद या कामगारांकडे आहे असे मत त्यांनी व्यक्त केले.

आज सत्तेतील लोकांबाबत जनतेच्या मनात शंका आहे. सरकारने जी आश्वासने दिली होती ती पूर्ण झालेली नाही. या सरकारच्या काळात दलित, मराठा, लिंगायत, मुस्लिम सर्वच समाज नाराज आहेत. अर्थमंत्री असताना सर्व समाजाला आपण योग्य न्याय दिला मात्र हे सरकार सर्व समाज घटकांवर अन्याय करत असल्याची टीका पाटील यांनी केली. लोकसभा आणि विधानसभा निवडणुका डिसेंबरमध्ये लागल्या तर या निवडणुकांसाठी आपण सज्ज राहायला पाहिजे असे आवाहन पाटील यांनी केले. महाराष्ट्रात सत्तापालट झाल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

बैठकीदरम्यान माथाडी कामगार सेलचे प्रमुख नरेंद्र पाटील यांनी संवाद साधला. नवी मुंबईत बैठक घेऊन माथाडी कामगारांच्या प्रश्नांवर चर्चा केली. हे प्रश्न शरद पवार साहेबांकडे मांडण्याचे ठरवले आहे. १९९९ साली पक्षाची स्थापना झाल्यापासून आम्ही सर्व माथाडी राष्ट्रवादीच्या पाठिशी उभे आहोत आणि पुढेही राहू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आम्ही नेहमी माथाडी कामगारांच्या प्रश्नासाठी संघर्ष केला. विरोधात आल्यापासून अनेक आंदोलनं केली. माथाडी कामगारांच्या प्रश्नांसाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. राष्ट्रवादीने जी संधी दिली त्याबाबत नरेंद्र पाटील यांनी पक्षाचे आभार मानले.

बैठकीसाठी आ. राणा जगजितसिंह पाटील, माथाडी कामगार अध्यक्ष एकनाथ जाधव, कार्याध्यक्ष गुलाबराव जगताप आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.

संबंधित लेख