गरीब घरातील ऋतुजाच्या डॉक्टर बनण्याच्या स्वप्नाला मिळाले बळ खा. डॉ. अमोल कोल्हे यांनी स्वीकारले शैक्षणिक पालकत्व

यंदा दहावीच्या परीक्षेत उज्ज्वल यश मिळवणार्‍या आमलेवाडी बोतार्डेच्या ऋतुजा प्रकाश आमले हिचे डॉक्टर होण्याचे स्वप्न आर्थिक परिस्थिती नसल्याने अपूर्ण राहणार होते. दहावीच्या परीक्षेत तब्बल ९९.६० गुण मिळवून नेत्रदीपक यश संपादन केल्यानंतरही घरची गरिबी तिला आपल्या स्वप्नांपासून वंचित करत होती. मात्र ऋतुजाच्या स्वप्नांना आता खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी बळ दिले आहे. डॉ. कोल्हे यांनी तिचे शैक्षणिक पालकत्व स्वीकारले असून डॉक्टर होण्याचे तिचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. तसेच ऋतुजाला ऑनलाईन शिक्षण घेता यावे यासाठी डॉ. अमोल कोल्हे यांच्या ‘जगदंब प्रतिष्ठान’च्या वतीने अॅण्ड्रॉईड मोबाईलही तिला भेट देण्यात आला.

 

वर्तमानपत्रात छापून आलेल्या बातमीची दखल घेऊन तातडीने ऋतुजाचे शैक्षणिक पालकत्व स्वीकारल्याबद्दल तिच्या कुटुंबीयांनी समाधान व्यक्त करत अशाप्रकारे संवेदनशीलपणे काम करणारा खासदार लोकप्रतिनिधी लाभला याचा मनस्वी आनंद व्यक्त केला.

 

ग्रामीण भागातील विशेषतः बोतार्डेसारख्या आदिवासी क्षेत्रातील हलाखीची परिस्थिती असलेल्या कुटुंबातील एक मुलगी कष्टाने शैक्षणिक यश मिळवते, डॉक्टर होऊन समाजाची सेवा करण्याचा निश्चय करते ही कौतुकास्पद बाब आहे. अशा गुणवान व आपल्या समाजासाठी काहीतरी करण्याची मनिषा बाळगणाऱ्या ऋतुजाचे शैक्षणिक पालकत्व स्वीकारुन तिचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मदत करण्याचं भाग्य मला लाभलं ही माझ्यासाठी अतिशय महत्त्वाची बाब आहे, अशी भावना डॉ. कोल्हे यांनी व्यक्त केली आहे.

खासगी रुग्णालयांकडून होणारी अवाजवी शुल्क आकारणी रोखण्यासाठी राज्यात भरारी पथके नेमण्याचे निर्देश – ना. राजेश टोपे

राज्यात कोरोनाबाधितांच्या उपचारांसाठी खासगी रुग्णालये आणि रुग्णवाहिकांनी अवाजवी शुल्क आकारणी करू नये, असे निर्देश राज्य शासनाने वेळोवेळी दिले आहेत. या निर्देशांची अंमलबजावणी योग्यप्रकारे होत आहे की नाही याच्या तपासणीसाठी राज्यात भरारी पथके नेमण्यात आली आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज मुंबईत दिली. यासंदर्भात आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त यांना पत्र पाठविले असून तपासणी अहवाल तीन दिवसात शासनाला सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

कोरोनाबाधित रुग्णांना वाजवी दरात उपचार मिळावेत यासाठी राज्य शासनाने २१ मे २०२० रोजी काढलेल्या अधिसूचनेद्वारे खासगी रुग्णालयांना कमाल दर मर्यादा निश्चित करून दिली आहे. त्याचबरोबर राज्यातील सर्व नागरिकांना महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजना लागू करण्यात आली असून खासगी वाहने आणि रुग्णवाहिका अधिग्रहीत करून त्यांचे कमाल दरही निश्चित केले आहेत. तसेच खासगी रुग्णालयांनी खाटा उपलब्ध करून देण्याबाबतच्या अधिसूचनेच्या प्रभावी अमंलबजावणीचेही निर्देश देण्यात आले आहेत. असे असताना अद्यापही खासगी रुग्णालयांमध्ये उपचार घेत असलेल्या कोरोनाबाधित रुग्णांकडून जास्तीचे शुल्क आकारले जात असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. याची दखल घेऊन राज्यातील जनतेच्या हितासाठी घेतलेल्या निर्णयांची प्रभावी आणि काटोकोरपणे अंमलबजावणी व्हावी म्हणून जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्तांनी तसेच विभागीय आयुक्तांनी देखील त्यांच्या स्तरावर भरारी पथक नेमण्याचे निर्देश आरोग्यमंत्र्यांनी दिले आहेत.

गुगल क्लासरुम’ सुरु करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य शैक्षणिक क्षेत्रासाठी महाराष्ट्र विकास आघाडी सरकारचे अभिनव पाऊल

कोरोनामुळे सध्या आपले जग बंदिस्त झाले असताना उद्याचे जग आणि उद्याचे शिक्षण कसे असेल यासाठी अभिनव उपक्रम महाविकास आघाडी सरकारने हाती घेतला आहे. महाराष्ट्राच्या शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांच्या विकासाचे स्वप्न प्रत्यक्षात आणत , ‘जी स्वीट’ आणि ‘गुगल’ क्लासरुमच्या माध्यमातून एक पाऊल आत्मविश्वासाने पुढे टाकले आहे. आज महाराष्ट्र शासन व गूगल यांच्यामार्फत राज्यातील शाळांसाठी सुरू करण्यात आलेल्या गूगल क्लासरूम प्रकल्पाचे मा. मुख्यमंत्री ना. उद्धव ठाकरे यांनी उद्घाटन केले. या कार्यक्रमात मा. उपमुख्यमंत्री ना. अजित पवार, शालेय शिक्षण मंत्री श्रीमती वर्षा गायकवाड, राज्यमंत्री बच्चू कडू सहभागी झाले होते.
हे पाऊल टाकणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले त्याचा मला सार्थ अभिमान वाटतो, अशी भावना व्यक्त करत मा. मुख्यमंत्र्यांनी शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड आणि शिक्षण विभागातील सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.
विद्यार्थ्यांना शिक्षण उपलब्ध करुन देण्यासाठी महाराष्ट्र शासनासोबत गुगलने भागिदारी केली आहे. या भागीदारीमुळे राज्यातील 2.3 कोटी विद्यार्थी आणि शिक्षक एकत्रित शिक्षण कार्यक्रमांमध्ये प्रवेश करू शकणार आहेत. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसह राज्यातील इतर विद्यार्थ्यांचे शिक्षण या कठीण काळात थांबू नये, आणि