राहुल गांधींवर बळाचा वापर करणाऱ्या युपी पोलिसांना निलंबित करा – विद्या चव्हाण

राहुल गांधींवर बळाचा वापर करणाऱ्या युपी पोलिसांना निलंबित करा - विद्या चव्हाण

काँग्रेस नेते राहुल गांधी आज हाथरस बलात्कार पीडितेच्या कुटुंबियांची भेट घेण्यासाठी निघाले असता उत्तर प्रदेश पोलिसांनी त्यांना धक्काबुक्की केली आणि त्यांच्यावर बळाचा वापर केल्याचे निदर्शनास आलेय. अशा प्रकारे एका विरोधी पक्षातील राष्ट्रीय नेत्याला मारण्याचे काम होत असेल तर ते अत्यंत निंदनीय आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या विद्या चव्हाण यांनी केली आहे. हाथरस येथील सामूहिक बलात्काराच्या घटनेला उत्तर प्रदेश सरकारकडून दाबण्याचे प्रयत्न होत असल्याचा आरोप चव्हाण यांनी केला. पीडित मुलीच्या परिवाराला कोंडून ठेवणे, पीडितेचा मृतदेह रात्रीत जाळून टाकणे यातून संबंधित घटनेचे पुरावे नष्ट करण्याचे काम पोलीस प्रशासनाने केले असल्याचा आरोपही विद्या चव्हाण यांनी केलाय.

आजकाल एक वेगळा प्रकार पहायला मिळत आहे. सवर्ण परिषदेच्या लोकांनी आरोपीला शिक्षा होऊ नये म्हणून वरिष्ठ पोलिसांच्या दालनाबाहेर आंदोलने केली आहेत. कठुआ येथेही अशाच प्रकारची घटना घडली. हा सर्व प्रकार संतापजनक आहे. राहुल गांधी व प्रियांका गांधी हे पीडितेच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेण्यास निघाले होते. अशावेळी पोलिसांनीच कायदा हातात घेतला. या घटनेची दखल उत्तर प्रदेशातील मायावती, अखिलेश यादव या नेत्यांनीही घ्यायला हवी, असे प्रतिपादन विद्या चव्हाण यांनी केले. विरोधी पक्षातील राष्ट्रीय नेत्यावर बळाचा वापर करणाऱ्या संबंधित पोलिसांना निलंबित करावे, अशी मागणीही विद्या चव्हाण यांनी केली आहे.