युनायटेड यूथ फ्रंटच्या वतीने ‘संविधान बचाओ रॅली’

२५ नोव्हेंबर २०१८ रोजी, सकाळी ११ वा.

मुंबई, २५ नोव्हेंबर २०१८ रोजी

काही दिवसांपूर्वी दिल्लीत काही समाजकंटकांकडून संविधान जाळण्यात आले. या निषेधार्ह कृत्याविरोधात आवाज उठविला गेला नाही. पण या कृतीचा निषेध करण्यासाठी, संविधान वाचवण्यासाठी, संविधानाच्या सन्मानासाठी येत्या २५ नोव्हेंबर २०१८ रोजी युनायटेड यूथ फ्रंटच्या वतीने ‘संविधान बचाओ रॅली’ काढण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे आ. जितेंद्र आव्हाड यांनी दिली. आज मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. राजगृह ते चैत्यभूमी असा या रॅलीचा प्रवास होणार असून ‘हम उतरे मैदान में, संविधान के सन्मान में‘ असा नारा देत १४ युवा संघटना यात सहभागी होणार असल्याचे आव्हाड यांनी सांगितले. यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष धीरज शर्मा, महाराष्ट्र युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते पाटील, मानवी हक्क अभियानचे प्रदेशाध्यक्ष दत्ता आव्हाड, युवा नेते शैलेश मोहीते,सूरज ठाकूर, युवक काँग्रेसचे प्रवक्ते आनंद दुबे, राष्ट्रवादी युवक काँग्रेस सरचिटणीस सूरज चव्हाण, मुंबई काँग्रेस अध्यक्ष गणेश यादव, युवक काँग्रेस सरचिटणीस ब्रीज किशोर दत्त आणि इतर संघटनांचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

वाढती हुकूमशाही वृत्ती, फॅसिझमचा विरोध करण्यासाठी कन्हैया कुमार, जिग्नेश मेवाणी, यांसारखे लढवय्ये युवा नेते या संविधान बचाओ रॅलीत सहभागी होणार असल्याचे आव्हाड यांनी सांगितले. संपूर्ण देशात हा संविधानाचा जागर करण्यात येणार असून आंदोलनाची सुरूवात बाबासाहेब आंबेडकर यांची कार्यभूमी असलेल्या मुंबईतून होईल, अशी माहिती त्यांनी दिली.

संविधानात्मक विचार टिकवण्यासाठी मोठी युवाशक्ती एकत्र येत आहे. १४ संघटना एकत्र येऊन हा कार्यक्रम घेत आहेत. ज्यांचा संविधानावर विश्वास आहे ते लोक आमच्या सोबत जोडले गेले आहेत. आज देशातील परिस्थिती पाहता देशातील तरुणांना एकत्र यावेच लागेल, असे मत राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष धीरज शर्मा यांनी यावेळी व्यक्त केले.