गरीब घरातील ऋतुजाच्या डॉक्टर बनण्याच्या स्वप्नाला मिळाले बळ खा. डॉ. अमोल कोल्हे यांनी स्वीकारले शैक्षणिक पालकत्व

यंदा दहावीच्या परीक्षेत उज्ज्वल यश मिळवणार्‍या आमलेवाडी बोतार्डेच्या ऋतुजा प्रकाश आमले हिचे डॉक्टर होण्याचे स्वप्न आर्थिक परिस्थिती नसल्याने अपूर्ण राहणार होते. दहावीच्या परीक्षेत तब्बल ९९.६० गुण मिळवून नेत्रदीपक यश संपादन केल्यानंतरही घरची गरिबी तिला आपल्या स्वप्नांपासून वंचित करत होती. मात्र ऋतुजाच्या स्वप्नांना आता खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी बळ दिले आहे. डॉ. कोल्हे यांनी तिचे शैक्षणिक पालकत्व स्वीकारले असून डॉक्टर होण्याचे तिचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. तसेच ऋतुजाला ऑनलाईन शिक्षण घेता यावे यासाठी डॉ. अमोल कोल्हे यांच्या ‘जगदंब प्रतिष्ठान’च्या वतीने अॅण्ड्रॉईड मोबाईलही तिला भेट देण्यात आला.

 

वर्तमानपत्रात छापून आलेल्या बातमीची दखल घेऊन तातडीने ऋतुजाचे शैक्षणिक पालकत्व स्वीकारल्याबद्दल तिच्या कुटुंबीयांनी समाधान व्यक्त करत अशाप्रकारे संवेदनशीलपणे काम करणारा खासदार लोकप्रतिनिधी लाभला याचा मनस्वी आनंद व्यक्त केला.

 

ग्रामीण भागातील विशेषतः बोतार्डेसारख्या आदिवासी क्षेत्रातील हलाखीची परिस्थिती असलेल्या कुटुंबातील एक मुलगी कष्टाने शैक्षणिक यश मिळवते, डॉक्टर होऊन समाजाची सेवा करण्याचा निश्चय करते ही कौतुकास्पद बाब आहे. अशा गुणवान व आपल्या समाजासाठी काहीतरी करण्याची मनिषा बाळगणाऱ्या ऋतुजाचे शैक्षणिक पालकत्व स्वीकारुन तिचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मदत करण्याचं भाग्य मला लाभलं ही माझ्यासाठी अतिशय महत्त्वाची बाब आहे, अशी भावना डॉ. कोल्हे यांनी व्यक्त केली आहे.